Mon, Jan 21, 2019 13:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील बँकांची सफाई होत आहे 

देशातील बँकांची सफाई होत आहे 

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 23 2018 1:18AMमुंबई :  प्रतिनिधी 

भाजपचे सरकार गंगा सफाईच्या बाता मारत असताना प्रत्यक्षात मात्र देशातील बँकांची सफाई होत आहे, असा टोला गुजरातमधील सामाजिक कार्यकर्ते हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लगावला. मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमला मार्गदर्शन करण्यासाठी पटेल गुरूवारी मुंबईत आले होते. भाजप सरकार व मोदी हे देशात भ्रष्ट्राचार होऊ देणार नाही अशा वल्गना करत होते, मात्र प्रत्यक्षात विजय मल्ल्या व नीरव मोदी ज्याप्रकारे देशाचे पैसे बुडवून सुखरूपरित्या देशाबाहेर पळून गेले त्यावरून भाजप सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप पटेल यांनी केला. 

 भाजपने सोशल मीडियासाठी वर्षाला 200 ते 300 कोटी खर्च केले आहेत. सोशल मीडियाच्या जोरावर मोदी पंतप्रधान झाले आहेत. मात्र याच सोशल मीडियाच्या जोरावर भाजप सरकारचा पराभव केला जाऊ शकतो असा दावा पटेल यांनी केला. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील, संदेश कोंडविलकर व मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

पटेल म्हणाले सोशल मीडियामुळे एखादा संदेश 15 सेकंदांमध्ये 25 लाख लोकांपर्यंत पोहचू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक यांचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. सोशल मीडियावर एखादी चळवळ किंवा आंदोलन आपण उभे करू शकतो. आता ट्विटर आता जास्त शक्तिशाली व प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियाच्या जोरावर जागृती व उठाव करून भाजप सरकारला उलथवून टाकू शकतो. टीमने अधिक सक्षम व क्रियाशील होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.