होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेतील  गटबाजी आली चव्हाट्यावर

शिवसेनेतील  गटबाजी आली चव्हाट्यावर

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 2:01AMमुंबई : राजेश सावंत

शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मातोश्रीच्या  जवळ असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला पालिकेतील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी  विभागप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांना स्थायी समिती पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून त्यांना मुख्य प्रवाहातून दूर केले आहे. त्यामुळे या गटबाजीचा जनक कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मातोश्रीच्या मर्जीतील नेत्याच्या नगरसेवकांना हार पत्कारावी लागली. त्यामुळे या नेत्याने काही ज्येष्ठ नगरसेवकांना हाताशी धरून, पालिकेतील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पालिका निवडणुकीनंतर महापौर व स्थायी समिती अध्यक्षपदाचे दावेदार असणार्‍या मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांना या पदापासून दूर ठेवण्यात आले. आपला पत्ता कापला गेल्यामुळे सातमकर व चेंबूरकर यांनी जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. थेट मातोश्रीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्याने या दोघांनाही एकाही समितीचे अध्यक्षपद न देता, स्थायी समितीचे सदस्य पद देऊन बोळवण केली. पण स्थायी समितीतही हे दोघे वरचढ होत असल्याचे लक्षात येताच त्यांचा पत्ता कट करण्याचे राजकीय डावपेच आखण्यात आले. 

दरम्यानच्या काळात स्थायी समितीची सर्व सूत्रे सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या हातात देण्यात आली. शिवसेनेच्या स्थायी समिती अध्यक्षांना अर्थकारणाचे बाळकडू पाजणार्‍या खाजगी सचिवाला हटवण्यात आले व त्याजागी आपल्या मर्जीतील व्यक्ती बसवली. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर हे नावापुरते उरले आहेत. आता तर सातमकर व चेंबूरकर यांना मुख्य प्रवाहातून दूर  केल्यामुळे मातोश्रीच्या जवळ असलेल्या नेत्याचे पालिकेतील वजन वाढणार आहे. मातोश्रीबद्दल जाहिर नाराजी व्यक्त करणार्‍यांचे पंख छाटण्याची शिवसेनेची जुनी परंपरा आहेत.

यात माजी महापौर नंदू साटम, हरेश्‍वर पाटील, दत्ता दळवी यांच्यासह शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे व नेत्यांचे बळी गेले आहेत. या पंक्तीत आता सातमकर व चेंबूरकर यांना आणून बसवले आहे. दिलीप लांडे यांची वर्णी लागण्याची शक्यता अलिकडेच मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. त्यावरून मोठा गदारोळही उठला. या प्रवशाने सेनेचे संख्याबळ वाढले आणि सत्तेवरील मांड मजबूत झाली. मात्र, त्याची अशी किंमत मोजावी लागेल, याचा अंदाज नगरसेवकांना नसावा. मनसेच्या फुटीरांची व्यवस्था करण्यासाठीच स्थायी समितीत राजीनामा नाट्य घडवले गेले. आता  रिक्त झालेल्या जागी मनसेतून शिवसेनेत आलेल्या दिलीप लांडे व त्यांच्या एका सहकार्‍याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसे वचनच शिवसेनेच्या वतीने देण्यात आल्याचे समजते.