Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्ठांचा मान राखण्याचे विद्यार्थ्यांना धडे द्या

ज्येष्ठांचा मान राखण्याचे विद्यार्थ्यांना धडे द्या

Published On: Mar 11 2018 1:45AM | Last Updated: Mar 11 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी 

ज्येष्ठ नागरिकांशी कसे वागावे, त्यांचा मानसन्मान कसा राखावा, याचे तरुण पिढीला भानच राहिलेले नाही. त्यामुळे अनेकदा रेल्वेमधून प्रवास करताना, महाविद्यालयीन विद्यार्थी वृध्दांशी उध्दट बोलताना दिसून येतात. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकात मानसन्मानावर एकादा धडा अंतर्भूत करण्याचा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे. याबाबतचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करून तो राज्य  सरकारकाकडे पाठवण्यात येणार  आहे.     बदलती जीवनशैली आण आर्थिक समृध्दीला आलेले अवास्तव महत्व, यामुळे एकत्र कुटुंब पध्दत लोप पाऊन, विभक्त कुटुंब पध्दती पाहायला मिळते. त्यामुळे वयोवृध्द नागरिक नाकारलेपणाचे व उपेक्षेचे बळी पडत आहेत.  अनेक ज्येष्ठ नागरिक एकाकी जीवन व्यतीत करत असल्यामुळे ते स्वत:च्या प्रकृत्तीची काळजी घेेऊ शकत नाही.

उमेदीच्या काळात कर्तृत्व गाजवणार्‍या व्यक्तीही उतरत्या वयात असहाय्य व निराधार होतात, ही धक्कादायक बाब संशोधनाद्वारे उघडकीस आली आहे. भौतिक सुखाच्या मागे असलेली व परदेशी स्थायिक झालेली तरुण पिढी आपल्या वृद्ध माता-पित्यांची व अन्य ज्येष्ठ नागरिकांची पर्वा करत नाही. आपली प्रेमाने व आपुलकीने चौकशी व्हावी, एवढीच मापक अपेक्षा असते. पण मुंबई सारख्या शहरात ज्येष्ठांचा मानसन्मान ठेवला जात नाही.   ज्येष्ठांना उध्दट बोलणारे तरूण अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे मुलांना शालेय जीवनातच संस्काराचे धडे देणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांशी कसे वागावे, त्यांचा मानसन्मान व आदर कसा ठेवावा, यासाठी शालेय पाठ्यपुस्तकात संस्कारासंदर्भातील धडा अंतर्भूत करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या  नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. 

याबाबतची ठरावाची सूचना  घोसाळकर यांनी पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर केली असता, त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी हा ठराव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या चिटणीस विभागाकडून  सांगण्यात आले.