Sun, May 19, 2019 14:13
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत एसआरएचे घरही 315 चौफूचे!

मुंबईत एसआरएचे घरही 315 चौफूचे!

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 12:46AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेतील घरांप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) घरांच्या क्षेत्रफळाची मर्यादा 269 चौरस फुटांवरून वाढवून 315 चौरस फूट करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 315 चौरस फूट क्षेत्रफळाचे घर देण्यात येते. यानुसार राज्य सरकारही एसआरए योजनेतील घरांचे क्षेत्रफळ वाढवण्याबाबत विचार करत असून अशाप्रकारे घरांच्या क्षेत्रफळाची मर्यादा वाढवल्यास सध्या सुरू असलेल्या योजनांमधील घरांबाबत काय निर्णय घ्यायचा याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. तीन महिन्यांत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला गृहनिर्माण विभागाने दिले आहेत. 

याआधी सन 2001 ते 20111 पर्यंतच्या बेकायदा झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पक्की घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एसआरए अंतर्गत सुरुवातीला 225 चौरस फुटांचे घर देण्यात येत होते. मात्र 2008 सालात केंद्र सरकारने आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला. यानुसार देण्यात येणार्‍या घरांच्या क्षेत्रफळात वाढ केल्यानंतर राज्यातही एसआरएच्या घरांचे क्षेत्रफळ 225 वरून 269 चौरस फूट करण्यात आले होते. आता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 30 चौरस मीटर अर्थात 315 चौरस फूट क्षेत्रफळाचे घर देण्यात येते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील निवासी सदनिकांच्या संदर्भातही राज्य सरकारचे धोरण केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत असावे, यासाठी राज्य सरकार एसआरए योजनेतील घरांचे क्षेत्रफळ वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे.