Tue, Jul 23, 2019 04:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या रस्त्यांवर 32 कंपन्यांची कुदळ

मुंबईच्या रस्त्यांवर 32 कंपन्यांची कुदळ

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 1:54AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईच्या रस्त्यावर असलेले खड्डे हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. निकृष्ट दर्जाचे काम खड्ड्यांना कारणीभूत ठरत असले तरी विविध प्रकारच्या 32 कंपन्यांमुळेही रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. या कंपन्यांमध्ये वीज, स्वयंपाकाचा गॅस, दूरध्वनी, इंटरनेट कनेक्शन पुरवणार्‍या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांद्वारे सातत्याने खोदकाम सुरू असते. एखादे कनेक्शन देेण्यासाठी खणलेला रस्ता पुन्हा चांगल्या स्थितीत आणण्यासाठी तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. 

मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे रस्ते या ना त्या कारणामुळे सातत्याने खणले जातात. तब्बल 32 कंपन्या त्यांचे केबल आणि पाईप टाकण्यासाठी हे खोदकाम करत असतात. देशातील इतर कोणत्याही शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात खोदकाम होत नाही. शहरातील 20 ते 25 टक्के रस्ते या ना त्या कारणामुळे सातत्याने नादुरुस्त अवस्थेत असतात. योगायोगाने शहरातील जे भाग झपाट्याने विकसित होत आहेत. त्या भागातच रस्त्यांची अशी अवस्था आहे. वांद्रे, अंधेरी, मानखुर्द, एल्फिन्स्टन, परळ, कुर्ला, गोरेगाव आणि बोरिवली या भागात विकास कामे प्रचंड मोठ्या गतीने सुरू आहेत. या भागातील रस्ते सतत खोदले जात आहेत. गेल्या वर्षी वेगवेगळ्या कंपन्यांकडून केबल टाकण्याच्या परवानगीसाठी तब्बल 27 हजार 48 अर्ज आले होते.

केबल टाकण्यासाठी मोठे चर खणले जातात. त्यामुळे पावसाळ्यात तेथे पाणी साचते. परिणामी रस्त्याच्या खाली पाणी झिरपून ते रस्ते कमकुवत बनतात. खड्डे पडण्याचे हे एक मुख्य कारण मानले जाते. केबल वगैरे टाकून झाल्यानंतर पूर्वी रस्ता ज्या स्थितीत होता तसा राहात नाही. अर्थात रस्त्याच्या खोदाईसाठी महापालिका संबंधित कंपनीकडून शुल्क आकारते. हे शुल्क प्रतिमीटर 5 हजारांपासून ते 21 हजारांपर्यंत असते. काँक्रिट, डांबर आणि पेव्हर ब्लॉक अशा प्रकारानुसार हे शुल्क आकारले जाते. अनेकदा कंपन्यांकडून कामे बरेच दिवस अर्धवट अवस्थेत सोडली जातात. त्यावेळी रस्ता उखडलेला असतो. महापालिकेला अशा परिस्थितीत काही करता येत नाही.