Tue, May 21, 2019 22:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 402 पैकी 129 निकाल जाहीर

402 पैकी 129 निकाल जाहीर

Published On: Jan 20 2018 1:50AM | Last Updated: Jan 20 2018 1:46AMमुंबई: प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होतील अशी माहिती देत सुमारे 10 लाख 49 हजार 303 उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असून उर्वारित तीन लाख 57 हजार 532 उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे सध्या हिवाळी परीक्षांच्या निकालांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे हे देखील उपस्थित होते. 

मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र 2017 च्या 402 परीक्षांपैकी 129 परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहिर केले असून 75 टक्के मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. द्वितीय सत्र 2017 च्या 402 परीक्षांसाठी एकूण 14,07,035 उत्तरपत्रिका विद्यापीठाकडे उपलब्ध असून त्यापैकी 10,49,303 उत्तरपुस्तिकांचे संगणकाधारित मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित 3,57,532 उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन येत्या काही दिवसात पूर्ण होणार असून लवकरच सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.

द्वितीय सत्रामध्ये चार विद्याशाखा अनुक्रमे विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेसाठी 199 परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी 1,34,940 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. तर वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेत 66 परीक्षांना 1,69,457 एवढे विद्यार्थी प्रवेशित आहेत. मानव्य शाखेसाठी 74 परीक्षांना 59,280 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. तर आंतरविद्याशाखा 63 परीक्षांना 13,009 एवढे विद्यार्थी प्रवेशित आहेत. या सर्व 402 परीक्षांसाठी 3,76,686 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.

मानव्य शाखेतील 74 निकालांपैकी 17 निकाल, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील 66 पैकी 15 निकाल, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील 199 निकालांपैकी 55 निकाल, आंतरविद्याशाखेतील 63 निकालांपैकी 42 असे एकूण 129 निकाल विद्यापीठाने जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.द्वीतीय सत्र 2017 च्या संगणकाधारित मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे एकूण 12,618 एवढे शिक्षक उपलब्ध आहेत.