Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिफायनरीचा सामंजस्य करार करण्याचा निर्णय मागे

रिफायनरीचा सामंजस्य करार करण्याचा निर्णय मागे

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 1:54AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये नाणार रिफायनरीबाबत होणारा सामंजस्य करार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांच्या भावनांचा आदर करु. हा प्रकल्प त्यांच्यावर लादला जाणार नाही. त्यांच्या शंकांचे निरसन करुनच हा प्रकल्प राबविला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन नाणार येथील स्थानिकांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानी घातल्या. या प्रकल्पाला स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, वैभव नाईक तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तही उपस्थित होते. 

येत्या 18 तारखेपासून मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात मॅग्नेटिक महाराष्ट्र हे औद्योगिक प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनामध्ये नाणार रिफायनरीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात येणार होता.या सामंजस्य कराराला प्रदर्शनात महत्वाचे स्थान देण्यात आले होते. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाणार रिफायनरीसंदर्भात सामंजस्य करार होणार असल्याची माहिती पुढे आल्याने शिवसेनेची कोंडी झाली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे यांच्या झालेल्या चर्चेनंतर सामंजस्य करार करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.  

नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरण आणि पारंपारिक उद्योग धंद्यावर परिणाम होणार आहे. मच्छिमार आणि आंबा उत्पादकांमध्येही या प्रकल्पाबाबत भितीचे वातावरण आहे. त्यामुळे स्थानिकांना विश्‍वासात न घेता आणि त्यांचे प्रश्‍न न सोडविता हा प्रकल्प रेटू नये, असे उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. स्थानिकांचा विरोध असेल तर राज्य सरकारही हा प्रकल्प रेटणार नाही. स्थानिकांच्या शंकांचे निरसन करुनच राज्य सरकार प्रकल्प राबविल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.