Fri, Nov 16, 2018 02:42



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास १३४ रुपयांनी महागणार?

मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास १३४ रुपयांनी महागणार?

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:55AM



मुंबई : प्रतिनिधी

मुंबई-पुण्यादरम्यान आरामशीर प्रवासासाठी शिवनेरी बसचा पर्याय निवडणार्‍या प्रवाशांना मोठा धक्का बसणार आहे. एसटी महामंडळाच्या प्रस्तावित भाडेवाढीमुळे मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास 134 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. डिझेल दरवाढीबरोबरच कर्मचार्‍यांची वेतनवाढ आणि महामार्गावरील टोलदरात झालेल्या वाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने 30 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव गुरुवारी परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासमोर मांडला.

एसटी महामंडळाचा प्रस्ताव मान्य झाल्यास मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसचे दर 456 वरून 590 रुपयांवर पोहोचू शकतात. इतर मार्गावरील साध्या आणि वातानुकूलित बसच्या भाड्यातही वाढ होऊन प्रवाशांच्या खिशाला कात्रीच लागण्याची चिन्हे आहेत. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे सुमारे 470 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम खर्च होणार आहे. वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती आणि महामार्गावरील टोलदरात झालेली वाढ यामुळे तब्बल 2200 कोटी रुपये संचित तोटा सहन करणार्‍या एसटीला नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.