मुंबई : पुढारी ऑनलाईन
मुंबईसह पुणे-लोणावळा लोकल रेल्वे मार्गावरील तांत्रिक कामासाठी आज (रविवारी) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५६ दरम्यान दिवा आणि परळ स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावरुन धावणार आहेत. परळनंतर त्या पुन्हा जलदगती मार्गावर चालवल्या जातील.
ब्लॉक कालावधीत दादर आणि सीएसएमटीकडे धावणाऱ्या सर्व मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांत धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक आहे. सीएसएमटी/वडाळ्याहून वाशी-बेलापूर-पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ पर्यंत बंद राहणार आहे.
पुणे-लोणावळा मेगाब्लॉकमुळे सिंहगड-प्रगती एक्स्प्रेसच्या फेऱ्या रद्द
पुणे-लोणावळा मार्गावर देखील आज मेगा ब्लॉक आहे. यामुळे मुंबई-पुणे-मुंबई या मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक सकाळी ११ : ४० ते दुपारी ४ : १० मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे. एक्स्प्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.