होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...तर शिवाजी पार्कवर जाहीर चर्चेला या : गडकरी

...तर शिवाजी पार्कवर जाहीर चर्चेला या : गडकरी

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 1:39AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

रस्ते, सिंचन आणि बंदर विकासासाठी राज्याला पाच लाख कोटी रुपये दिले आहेत. यामुळे थोड्याच दिवसात राज्यातील रस्ते मजबूत होणार असून, सिंचन क्षमता वाढीसदेखील मदत होणार आहे. आपले आकडे जर खोटे असतील, तर आरोप करणार्‍यांनी माझ्यासोबत शिवाजी पार्कवर चर्चेला यावे, असे आव्हान केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना दिले. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या मेळाव्यात बोलताना नितीन गडकरी हे हवेत फुगे सोडावे तसे आकडे सांगत असल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना नितीन गडकरी यांनी, आपण कोणतेही चुकीचे आकडे सांगत नाही. रस्ते विकासासाठी आपण राज्याला चार लाख कोटी रुपये दिले आहेत.

राज्यभर रस्त्यांची कामे सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर राज्याला चांगले रस्ते मिळतील. राज्यातील बंद पडलेल्या 108 सिंचन प्रकल्पांसाठी 20 हजार कोटी रुपये दिल्याने हे प्रकल्प सुरू झाले आहेत. सिंचनासाठीदेखील आपल्या खात्यामार्फत एक लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्याची 18 टक्क्यांवर असलेली सिंचन क्षमता 40 टक्क्यांवर नेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही गडकरी म्हणाले. भाजप हा पिता-पुत्र किंवा आई आणि मुलाचा पक्ष नाही. तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.

सर्वसामान्य कार्यकर्ताही येथे पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, अशी टीका विरोधकांवर करताना ज्यांनी इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज असो की डीएड, बीएड कॉलेजचा धंदा केला ते आज समतेची भाषा करीत आहेत, असा टोलाही गडकरी यांनी लगावला.  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उंदराच्या गोळ्यांवरून झालेल्या घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधकांवर टीका करताना उंदीर मंत्रालयात नाहीत, तर यांच्या डोक्यात आहेत. सरकार चांगले काम करीत असताना उंदीर बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, कौरव कितीही एकत्र आले तरी पुन्हा भाजपच जिंकेल, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

चंद्रकांतदादांचा अजितदादांना इशारा

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हा हल्ला चढविताना त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेची बाजूही घेतली. शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत. शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे. त्यांना डिवचून आमच्यात तेढ निर्माण करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे पाटील म्हणाले. हल्लाबोल यात्रा काढणार्‍यांनी आधी स्वतःचा गल्ला भरला.

राज्याला अक्षरश: लुटले. राज्यात सिंचन घोटाळा केला, असे सांगतानाच अजित पवार यांनी भुजबळांच्या बाजूला आणखी दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत हे लक्षात ठेवावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पश्‍चिम महाराष्ट्र हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याला हादरा दिला. कोल्हापूरमध्ये एक आमदार होता. तेथे दोन आमदार निवडून आले. सांगली आणि सोलापूरमध्येही आम्ही विजय मिळविला. येत्या निवडणुकीत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरमधून किमान 16 जागा मिळवू, असा ठाम निर्धारही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला.
 

 

 

tags Mumbai,news, Public, talk,on ,Shivaji, Park, Development, Minister, Nitin, Gadkari ,Challenge,