Mon, Apr 22, 2019 16:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुरक्षित प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये खासगी तज्ज्ञ

सुरक्षित प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये खासगी तज्ज्ञ

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 12:08AMमुंबई  : विशेष प्रतिनिधी

ग्रामीण भागात विशेषज्ञांअभावी प्रसूतीदरम्यान होणारे माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यातील 101 आरोग्य संस्थांमध्ये 128 खासगी विशेषज्ञ डॉक्टरांची कंत्राटी, अर्धवेळ व ऑन कॉल या पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञांचा समावेश आहे. ग्रामीण भागात नियुक्ती देऊनदेखील डॉक्टर्स कामावर हजर न होण्याचे प्रमाण जास्त आहे. शासनाच्या आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात विशेषज्ञांची उपलब्धता नसल्याने सामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देताना अडचणी येतात.

बर्‍याचदा काही आरोग्य केंद्रांमध्ये एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावर रुग्ण तपासणी आणि त्या अनुषंगाने ताण येतो. तर काही ठिकाणी विशेषज्ञच उपलब्ध होत नाही, या सर्व बाबींचा विचार करून खासगी विशेषज्ञांची सेवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये घेण्याचा निर्णय झाला. यापूर्वीही खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जायची. आता मात्र त्यांना मानधनाबरोबरच कामानुसार अतिरिक्त मोबदला देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे.राज्यात सध्या 101 ठिकाणी नव्याने नियुक्त विशेषज्ञांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ 116 असून त्यात कायमस्वरूपी 64 आणि कंत्राटपद्धती वरील 52 विशेषज्ञांचा समावेश आहे. भूलतज्ज्ञांची संख्या 75 असून त्यात कायमस्वरूपी 30 आणि कंत्राटी पद्धतीवरील 45 डॉक्टरांचा समावेश असून बालरोग तज्ज्ञांमध्ये कायमस्वरूपी 61 आणि कंत्राटी पद्धतीवरील 30 असे एकूण 91 विशेषज्ञांची संख्या आहे.