Fri, Apr 26, 2019 19:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शुद्ध हवेसाठी मुंबईत 50 ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार

शुद्ध हवेसाठी मुंबईत 50 ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 12:38AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील वाढती वाहनसंख्या, बांधकाम आणि कचरा यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या वाढत आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध व धूळमुक्त हवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत 50 ठिकाणी. तसेच राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर या पाच महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. हवेतील वाढते प्रदूषण कमी करण्याबाबत स्ट्राटा इनव्हिरो कंपनीने पर्यावरण मंत्री कदम यांच्यापुढे शुक्रवारी मंत्रालयात सादरीकरण केले. या कंपनीच्या मदतीने मुंबई व राज्यातील अन्य शहरांत वाहने, इमारतीच्या बांधकामातील धूलीकण, धूर यामुळे होणारे प्रदूषण शास्त्रोक्त पद्धतीने कमी करण्यावर अधिक भर देण्याची गजर असल्याचे कदम यांनी सांगितले.

रस्त्यावर गाड्यांची संख्या वाढली आहे. ट्रॅफिक सिग्नल, बस आणि रेल्वे स्थानके, टोलनाके, वाहनतळ, पेट्रोल पंप, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवेत प्रदूषण होते. धूर आणि धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्ट्राटा इनव्हिरो कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर देशातील बेंगलुरु, दिल्ली, गोवा आणि ठाणे येथे ही प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे. संपूर्ण देशात 2019 पर्यंत शंभर शहरात ही यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमोल चापेकर यांनी सांगितले. हवेतील धूळ, विषारी वायू शोषून घेऊन शुद्ध हवा बाहेर टाकणारी यंत्रणा स्ट्राटा इनव्हिरो कंपनीने विकसित केली, असून विविध ठिकाणी ही यंत्रणा मोफत बसविली जाणार असल्याचे चापेकर यांनी सांगितले.  
 

 

tags ; Mumbai,news, Pollution control system in 50 locations in Mumbai