Mon, May 20, 2019 11:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पोलिसांची आठ तास ड्यूटी धोक्यात

मुंबई पोलिसांची आठ तास ड्यूटी धोक्यात

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 05 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई पोलिसांच्या आठ तास ड्युट्यांसाठी जातीने लक्ष घालत हा धाडसी निर्णय घेणार्‍या पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पोलीस महासंचालकपदी बढतीमुळे आठ तास ड्युट्यांना ग्रहण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या आठ तास ड्युट्यांबाबत अद्यापही शासन निर्णय जाहीर करण्यात आला नसून पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा तुटवडा आठ तास ड्युट्यांच्या मूळावर उठू शकतो अशा चर्चा पोलीस दलात सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मुंबई पोलीस दलामध्ये मे 2016 पासून सुरू झालेला आठ तास ड्युट्यांचा उपक्रम पडसलगीकर यांनी स्वतः जातीने लक्ष घालत पूर्णत्वास नेला. सध्या मुंबई पोलीस दलातील 94 पोलीस ठाण्यांपैकी सुमारे 90 पोलीस ठाण्यांमध्ये आठ तास ड्युट्यांचा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे रोजच्या 14 ते 15 तासांच्या ड्युटीतून पोलिसांची सुटका झाली असून त्यांच्यावर असलेला एक तणाव कमी झाला आहे. असे असले तरी पोलीस दलात असलेल्या परंपरेनुसार पोलीस प्रमुखाने एखादा निर्णय घेतला की, तो अधिकारी त्या पदावर असे पर्यंत सर्वजण त्याचे नियमाने पालन करतात. मात्र तो अधिकारी बदलला की, नवीन येणारा अधिकारी तो निर्णय पुढे सुरू ठेवेल याची शाश्‍वती नसते. त्यामुळे पडसलगीकर यांची पोलीस पोलीस महासंचालक पदावर बढती झाल्याने त्यांनी घेतलेल्या मुंबई पोलिसांच्या आठ तास ड्युट्यांच्या निर्णयावर टांगती तलवार असल्याचे बोलले जाते. 

मुंबईतील पोलिसांच्या आठ तास ड्युट्या करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पडसलगीकर यांनी याबाबत शासन आदेश काढण्यासाठी 7 फेब्रुवारीला एक अहवाल शासनाला सादर केला होता. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे पडसलगीकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सोडण्याच्या काही तास आधी आपल्या अधिकारात आठ तास ड्युट्यांचा आदेश काढला. मात्र याबाबत शासन आदेश न झाल्याने आठ तास ड्युट्यांचा त्यांचा निर्णय नवीन पोलीस आयुक्तांकडून कधीही बदलला जाऊ शकतो, असे एका अंमलदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

मुंबईचे पोलीस आयुक्त असताना राकेश मारिया यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेले हेल्पलाईन नंबर, तसेच शहरातील चौपाट्यांवर पोलिसांना गस्त घालणे सोपे व्हावे यासाठी दिलेल्या सायकल आता कुठेही दिसत नाहीत. तर डॉ. सत्यपाल सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात नागरिकांच्या तक्रारींसाठी शहरात विविध ठिकाणी बसविलेले 1 हजार तक्रार बाक्स, अप्पर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात पोलिसांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आयोजित केलेले दरबार, तसेच प्रत्येक शनिवारी सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी बैठकांचे आदेश आता इतिहास जमा झाले आहेत.

डी. शिवानंदन हे पोलीस आयुक्त असताना पोलिसांच्या शहरातील अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी राबविलेली स्ट्रीट पोलिसिंग योजना, तरुणांना पोलिसांशी जोडण्यासाठी तयार केलेली वेबसाईट, तर माजी पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांनी पोलिसांच्या फिटनेससाठी सुरू केलेल्या व्यायामशाळा आणि चांगले खाद्य पदार्थ मिळण्यासाठी चांगल्या उपाहारगृहांचे पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे. परंतु अहमद जावेद यांनी सुुरू केलेले ट्विटर हॅन्डल, मात्र आजही सुरू असल्याचाही याला एक अपवाद आहे.