Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे पंख छाटले

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे पंख छाटले

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 03 2017 12:27AM

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांच्या हॉकीस्टीकच्या दरार्‍याने गाजलेल्या मुंबई पोलिसांच्या सामजसेवा शाखेचे पंख छाटण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या प्रमुखांनी समाजसेवा शाखेवर कारवाई करत 17 पैकी तब्बल 15 अंमलदारांच्या बदलीचे तडकाफडकी आदेश काढल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

वेश्या व्यवसाय, डान्सबार, जुगार अशा समाजविघातक कृत्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अखत्यारीत येणार्‍या समाजसेवा शाखेवर आहे. या शाखेचा थेट सामन्यांशी संबंध नसला तरी समाजसेवा शाखेचे तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांच्या कारवाईमुळे या शाखेचे नाव सर्वदूर पसरले. ढोबळे यांची गाडी ज्या दिशेला वळेल त्यादिशेचे मुंबईच्या सीमेपर्यंतचे सर्व डान्सबार त्याकाळात बंद व्हायचे. मुंबईकरांनी त्यांच्या कारवाईचे समर्थन करत त्यांना डोक्यावर घेतले होते.

ढोबळे यांच्या काळात समाजसेवा शाखेने कमावलेले नाव आता चर्चेतून गायब झाले. कारवाईचा टक्कासुद्धा घसरला. गेल्या एक-दोन वर्षापासून स्थानिक पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या नेतृत्वातील पथक, गुन्हे शाखेची पथके, पोलीस उपायुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्तांची विशेष पथकेही शहरातील वेश्या व्यवसाय, डान्सबार, जुगार आणि बालमजुर यावर कारवाई करु लागली. समाजसेवा शाखा ही स्वतंत्र शाखा असतानाही कारवाई घटल्याची गांभीर्याने दखल घेत, गुन्हे शाखेच्या प्रमुखांकडून कारवाई करण्यात आल्याचे समजते. समाजसेवा शाखेतील 17 पैकी तब्बल 15 अंमलदारांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत प्रादेशिक विभागांनुसार 12 कक्ष, विशेष कक्ष, तसेच अंमली पदार्थ विरोधी विभाग, अंमलबजावणी विभाग आहेत. एखाद्या अंमलदाराची गुन्हे शाखेमध्ये बदली झाल्यास एका विभागामध्ये त्याला दोनच वर्षे काम करता येते. त्यानंतर त्याची अन्य कक्ष किंवा विभागांमध्ये बदली करण्याचा नियम असून त्याअंतर्गतच हे बदलीचे आदेश काढण्यात आल्याचे एका वरीष्ठ अधिकार्‍याने याबाबात बोलताना सांगितले. 

मात्र गेली अनेक वर्षे गुन्हे शाखेच्या एकाच विभागामध्ये अनेक अंमलदार कार्यरत असताना अशाप्रकारे दोन वर्षाच्या कार्यकाळाचा नियम लावत करण्यात आलेली ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.