Mon, Jul 13, 2020 00:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'निसर्ग'मुळे जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहतूक ठप्प 

'निसर्ग'मुळे जेएनपीटी बंदरातील वाहतूक ठप्प 

Last Updated: Jun 03 2020 3:39PM

file photoनवी मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा 

जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहतूक चक्रीवादळामुळे मंगळवारी संध्याकाळ पासून बुधवारी पुर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जेएनपीटी प्रशासनाने घेतला आहे. साधारणतः एका दिवसात 9 ते साडेनऊ हजार कंटेनरची वाहतूक या बंदरातून केली जाते. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

गेल्या महिन्यात 2 लाख 74 हजार 750 कंटेनरची वाहतूक जेएनपीटी बंदरातून करण्यात आली. म्हणजे दिवसाला सरासरी 9500 च्या आसपास ही वाहतूक होते. आखाती देशासह परदेशात मोठ्या प्रमाणावर समुद्र मार्गाने ही वाहतूक होते. मंगळवारी संध्याकाळी चक्रीवादळाचा तडका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने मंगळवारी रात्री वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. तो बुधवारी रात्रीपर्यंत असणार आहे. यामुळे जेएनपीटीतून बुधवारी एकही जहाज रवाना करण्यात आले नाही. 

लोडिंग, अनलोडिंग,  स्कनिंग,  मालवाहू कंटेनर व्यवस्था ठप्प झाली आहे. मुंबईसह इतर ठिकाणासाठी आलेले कंटेनर व बाहेरील देशात पाठविण्यात येणारे कंटेनर तसेच जेएनपीटी मार्गावर उभे आहेत. गुरूवारी सकाळपासून पुन्हा जेएनपीटी बंदरातून वाहतूक सुरळीत केली जाणार असल्याचे जेएनपीटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.