Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव मोदी ‘मल्ल्या’मार्गे पसार

नीरव मोदी ‘मल्ल्या’मार्गे पसार

Published On: Feb 16 2018 2:31AM | Last Updated: Feb 16 2018 2:31AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

पंजाब नॅशनल बँकेत केलेला 11 हजार 500 कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याच्या खूप आधीच मुंबईचा जगविख्यात हिरेव्यापारी नीरव मोदी आपल्या कुटुंबासह देशाबाहेर पसार झाला. स्टेट बँकेसह 17 बँकांना 9 हजार कोटींहून अधिक रुपयांना बुडवून उद्योगपती विजय मल्ल्या जसा देशाबाहेर पळाला तोच मार्ग नीरव मोदीनेही वापरला. आता या नीरवची शोधाशोध सुरू झाली आहे.  दुसरीकडे ‘पीएनबी’ने आणखी दहा अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. सीबीआयला पीएनबीकडून 280 कोटींच्या घोटाळ्याची पहिली तक्रार 29 जानेवारीला मिळाली. त्या आधीच एक जानेवारी रोजीच तो विदेशात निघून गेला. परवाच्या मंगळवारी सीबीआयला पीएनबीकडून घोटाळ्याच्या आणखी दोन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील घोटाळ्याची रक्कम 11 हजार 400 कोटींपेक्षा अधिक आहे. या तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल होत असताना नीरवसह एकही आरोपी भारतात नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. 

वाचा : हॉलीवूडच्या अभिनेत्रींना दागिने पुरवणारा व्यापारी

 बेल्जियमचा नागरिक असलेला त्याचा भाऊ नीलेशनेही त्याच दिवशी भारतातून पलायन केले. नीरवची पत्नी अमी अमेरिकेची नागरिक असून ती आणि नीरवचा व्यावसायिक भागीदार मेहूल चोक्सी यांनी 6 जानेवारीला पलायन केले. चोक्सी हा गीतांजली ज्वेलर्सचा मालक आहे. या चौघांविरुद्धही सीबीआयने ‘लूक-आऊट’ नोटीस जारी केली आहे. नीरव सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे मानले जाते.

पै न् पै वसूल केली जाईल  घोटाळा उघडकीस आल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापनाने खुलासा केला असून घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्याचे काम सुरू असल्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी म्हटले आहे. 2011 पासून हा घोटाळा सुरू होता. तो आता उघड झाला. यातील दोषींना पकडून कडक कारवाई करण्यासाठी बँक आपली संपूर्ण ताकद पणाला लावेल, असेही मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

वाचा : पीएनबीचा इतर बँकांना सावधानतेचा सल्ला

प्रसिद्ध हिरेव्यापारी असलेल्या नीरव मोदीने मामा मेहूल चोक्सी यांच्या मदतीने डायमंड आरएस, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंड्स नावाच्या तीन हिरेकंपन्या स्थापन केल्या. या तीन कंपन्यांच्या माध्यमातून हाँगकाँगमधून माल आयात करण्यासाठी त्याने लेटर ऑफ अंडरटेकिंगची (मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचे पत्र) मागणी बँकेकडे केली. अलाहाबाद बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर हे पत्र त्याने मागितले आणि बँकेत एक रुपयाही तारण न ठेवता या तीन्ही कंपन्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करण्यात आली. परिणामी अलाहाबाद बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधील शाखांनी या पत्राच्या आधारे नीरवला पैसा पुरवला. पीएनबीसोबत आता या बँकाही अडचणीत आल्या आहेत. 

वाचा :  ‘बँकेत पैसे ठेवले तर नीरव मोदींची भीती, घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची’

नीरव मोदीने जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट आहेत. बँकेचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकूलनाथ शेट्टी आणि त्यांचे सहकारी मनोज खरात यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करताना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांची सपशेल पायमल्ली केली होती. बँकेच्या काही खातेदारांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. तसेच इतर बँकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसा पाठवण्यात आल्याचे उघड झाल्याने बँकेतील अधिकारीही तपास यंत्राणांच्या रडारवर आहेत.

वाचा : पीएनबी घोटाळा ‘ईडी’चे छापे