होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हॉलीवूडच्या अभिनेत्रींना दागिने पुरवणारा व्यापारी

हॉलीवूडच्या अभिनेत्रींना दागिने पुरवणारा व्यापारी

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 15 2018 10:36PMमुंबई : प्रतिनिधी 

भारतातील डायमंड किंग म्हणून ओळख निर्माण करणारा नीरव मोदी 2010 मध्ये इतरांच्या तुलनेत रिटेल बिझनेसमध्ये तसा उशिराच उतरला होता. मात्र, अल्पावधीतच त्याने केट विन्स्लेट व डाकोटा जॉन्सनसारख्या हॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना ज्वेलरी व हिरे पुरवणारा विख्यात ज्वेलर्स म्हणून आपली ओळख निर्माण केली. ‘फोर्ब्ज’च्या 2013 च्या जगातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्याचा समावेश झाला होता. 48 वर्षीय मोदी अब्जाधीशांच्या यादीत 84 व्या क्रमांंकावर आहे. त्याच्याकडे तब्बल 12 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. बेल्जियममध्ये फायनान्सचे शिक्षण घेणार्‍या मोदीने परंपरागत हिरे व्यापारामध्ये करिअर करण्याचा अजिबात विचार केला नव्हता.

मात्र, वयाच्या 19 व्या वर्षी त्याला गीतांजली जेम्सचे मेहूल चोक्सी या त्याच्या नातेवाईकांकडे या धंद्याचे गणित शिकण्यासाठी पाठवण्यात आले. त्याची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्याने नीरव मोदी डायमंड ब्रँड नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केले असून मुंबई, दिल्ली, लंडन, हाँगकाँग व न्यूयॉर्क आदीसह जगभरात त्याचे 25 लक्झरी स्टोअर आहेत. त्याच्या शोरूममधील ज्वेलरीची किंमत किमान 10 लाख ते 50 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. 

1999 मध्ये त्याने फाईव्ह स्टार डायमंड या कंपनीची स्थापना करून त्या माध्यमातून दुर्मिळ हिर्‍यांचा व्यापार जगभरात सुरू केला. या माध्यमातून त्याने जागतिक स्तरावर आपले मजबूत नेटवर्क तयार करण्यात यश मिळवले. रशिया, रूमानिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये त्याने हिरे घडवण्याचे कारखाने सुरू  केले. त्याच्या मित्राने 2008 मध्ये अत्यंत दुर्मीळ असलेल्या हिर्‍यांच्या ज्वेलरीची मागणी केल्यानंतर नीरवने रिटेल बिझनेसमध्ये उतरण्याचा निर्णय पक्का केला.  

नवी दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये मोदीने 2014 मध्ये आपल्या पहिल्या फ्लॅगशिप लक्झरी स्टोअरचे उद्घाटन केले. पुढच्याच वर्षी त्याने मुंबईतील काळा घोडा परिसरात नवीन स्टोअर उघडले. 2015 मध्ये थेट न्यूयॉर्कमधील जगविख्यात मॅडिसन चौकात स्टोअर उघडण्यात त्याला यश मिळाले. नाओमी वॅटस, निम्रट कौर, लिसा हेडन व कोको रोचा सारखे हॉलीवूड कलाकार त्याच्या स्टोअरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. एवढ्यावरच न थांबता त्याने लंडन, सिंगापूर, बेल्जियम व मकाऊ सारख्या ठिकाणी आपले स्टोअर उघडले. गेल्यावर्षी मुंबईतील प्रसिद्ध रिदम हाऊसला त्याने 32 कोटी रुपयांना खरेदी केेले. त्या ठिकाणी रिटेल स्टोअर उघडण्याचे त्याचे बेत होते. अत्यंत मृदुभाषी असलेल्या नीरवला हिरे व्यापारातील तज्ज्ञ म्हणून मान्यता मिळाली आहे. 2009 मध्ये मंदीच्या काळात दुर्मीळ हिर्‍याची किंमत वाढवणे त्याने साध्य केले होते.