होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदिवासींची लूटमार, दलालांची मात्र‘समृद्धी’!

आदिवासींची लूटमार, दलालांची मात्र‘समृद्धी’!

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 1:25AMकसारा : वार्ताहर

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शहापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादीत करण्यात आल्या. या शेतजमिनी संपादीत करताना जमीन खरेदी, विक्री करणार्‍या दलालांनी अनेक बनावट रजिस्टर मारून पैसा लाटल्याची प्रकरणे सध्या मोठ्या प्रमाणात उघडकीस येऊ लागली आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कसारा बु. या भागात झाला असून, या क्षेत्रातून 51/अ या 7/12 वरील संपादीत केलेली जागा बोगस शेतकरी दाखवून त्या जमिनीचे 4 कोटी रुपये हडपल्याचे समोर आले आहे. 

याठिकाणी 51/अ मधील जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात आली. या जमिनीचे मूळ मालक पदु रामा धोबी हे मृत झाले असून, त्यांच्या वारसपैकी दत्तु पदु धोबी व अन्य जण या 51/अ चे मूळ मालक आहेत. परंतु 51/अ च्या 7/12 ला वारस लावण्यास विलंब होईल या कारणाने समृद्धीसाठी नेमलेल्या प्रकाश गायकर आणि तेजस गायकर यांनी प्रांताधिकारी भिवंडी यांची दिशाभूल करीत समृद्धीमध्ये गेलेली जमीन ही पदु रामा धोबीची नाही. देवराम शिड्या धोबी या 51/ब या 7/12 वरील मूळ जमीन मालकाला 51/अ चा मालक दाखवून शहापूर रजिस्टर कार्यालयात रजिस्टर मारून घेतले. तसेच त्याद्वारे तब्बल 4 कोटी रुपये मोबदला देवराम शिड्या धोबीला देण्यात आला. 

या प्रकरणाची कुणकुण 51/अ या जमिनीचे मूळ वारसदार दत्तु पदु धोबी यांना लागताच त्यांनी देवराम धोबी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना दलालांमार्फत धमकावण्यात आले. या प्रकरणानंतर दत्तु धोबी यांनी वारसा नोंद करून कागदोपत्री सर्व्हे केला असता 51/अ मधील आपल्या मूळ मालकीची जमीन गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची तक्रार भिवंडी प्रांताधिकारी व उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्याकडे केली असता त्यांनी कार्यालयातून हुसकावून लावल्याचा आरोप दत्तू धोबी यांनी केला आहे.

तसेच मला भूमिहिन करून छदाम देखील मिळाला नाही. स्वतः प्रांताधिकारी व नेमण्यात आलेल्या प्रकाश गायकर व संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास भिवंडी प्रात कार्यालयात कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा दत्तु धोबी व किसन धोबी यांनी दिला आहे. या तक्रारी अर्जानंतर देवराम शिड्या धोबी यांची बँक खाती गोठवण्यात आल्याचे समजते.