होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिका देणार १५ लाखांत परवडणारे घर!

मुंबई पालिका देणार १५ लाखांत परवडणारे घर!

Published On: Apr 29 2018 2:39AM | Last Updated: Apr 29 2018 2:38AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत 10 लाख परवडणारी घरं बांधण्याचा पालिकेचा संकल्प असून 2014-34 च्या विकास आराखड्यात त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे. या घरांच्या किमती राष्ट्रीय गृहनिर्माण धोरणानुसार निश्‍चित करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले. त्यामुळे सामान्य कुटुंबाचे अवघ्या 15 ते 16 लाख रुपयांत मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. 

मुंबईचा विकास आराखडा बिल्डरांच्या फायद्यासाठी असला तरी, परवडणार्‍या घरांचा निर्णय मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मुंबईत 13 हजार हेक्टर ना विकास क्षेत्र आहे. यात 10 हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. 700 हेक्टर क्षेत्रात झोपडपट्टी असून उर्वरित 2 हजार 300 हेक्टर क्षेत्रापैकी 2 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत.

त्याशिवाय मिठागराच्या 1 हजार 700 हेक्टर क्षेत्रापैकी 130 हेक्टर क्षेत्रातही परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. पण ही जमीन केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्यामुळे त्यासाठी केंद्राचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. ना विकास क्षेत्रातून उपलब्द होणार्‍या जमिनीची तीन भागात विभागणी करण्यात येणार आहे. यात परवडणारी घरे, विक्रीसाठी असलेली घरे व मोकळी जागा याचा समावेश आहे. परवडणार्‍या घराच्या विक्रीतून पालिकेला मिळणार्‍या महसूलातून त्या भागातील पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील. हा पैसा मुंबईतील अन्य विकास कामांसाठी वापरण्यात येणार नसल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. 

मुंबईत 10 लाख परवडणारी घरे उपलब्ध होणार असली तरी, या घराच्या किंमती किती असतील, असा प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडला आहे. याबाबत स्पष्टीकरण करताना, आयुक्तांनी राष्ट्रीय गृहनिर्माण धोरण 2010 चा आधार घेणार असल्याचे सांगितले. राष्ट्रीय धोरणात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 25 टक्के लोकांचे मासिक उत्पन्न 12 हजार 500 रुपये इतके असून 9 टक्के लोकांचे मासिक उत्पन्न 60 हजारापेक्षा जास्त आहे. तर उर्वरित 66 टक्के लोकांचे मासिक उत्पन्न 20 हजार रुपये इतके आहे. या 66 टक्के लोकांना डोळ्यासमोर ठेऊन, घरांच्या किमती निश्‍चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक घर 15 ते 16 लाख रुपयात उपलब्ध होऊ शकते. याला पालिका आयुक्तांनीही दुजोरा दिला आहे.

Tags : Mumbai Municipal Corporation, house, 15 lakh,