Tue, Oct 24, 2017 16:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिकेत सत्ताबदल अशक्य!

मुंबई पालिकेत सत्ताबदल अशक्य!

Published On: Oct 13 2017 1:57AM | Last Updated: Oct 13 2017 12:44AM

बुकमार्क करा

मुंबई : राजेश सावंत

मुंबई महापालिकेची भांडूप पोटनिवडणूक भाजपाने जिंकून सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शिवसेनेपेक्षा भाजपाच्या नगरसेवकांचे संख्याबळ अवघ्या एकने कमी असले तरी, चार अपक्ष नगरसेवकांना शिवसेनेने अगोदरच कायद्याच्या बंधनात बांधल्यामुळे भाजपाला सत्ता स्थापन करणे तांत्रिकदृष्या सध्यातरी शक्य नाही. 

भांडूप पोटनिवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेसह भाजपाने ताकद पणाला लावली होती. यात भाजपाला यश मिळाल्यामुळे त्यांची पालिकेतील ताकद वाढली आहे. भांडूप हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण येथे दिना बामा पाटील कुटुंबाचे वर्चस्व असल्यामुळे फेबुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीत काँग्रेसच्या प्रमिला पाटील विजयी झाल्या होत्या. पण त्यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबालाच भाजपाने काबीज केल्यामुळे कधी नव्हे ते भांडूपमध्ये भाजपाचा झेंडा फडकला. विशेष म्हणजे पोटनिवडणूकीत कधीही हार न माणणार्‍या शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे काँग्रेसचे संख्याबळ 31 वरून 30 वर आले आहे. या विजयाने भाजपने पालिकेतील ताकदही वाढवली आहे. पालिकेत सध्या शिवसेनेचे 84 नगरसेवक तर भाजपाचे 82 नगरसेवक आहेत. यात आता भांडूपची जागा जिंकल्यामुळे भाजपाचे संख्याबळ 83 झाले आहे. पण कांदिवलीच्या भाजपा नगरसेविका शैलाजा गिरकर यांचे निधन झाल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांचे संख्याबळ 82 राहणार आहे. 

कांदिवली हा भाजपाचा बालेकिल्ला असल्यामुळे येणार्‍या सहा महिन्यात येथील पोटनिवडणूकीत भाजपा विजयी होणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ 83 होणार आहे. त्यामुळे सेना व भाजपात अवघ्या एका नगरसेवकाचा फरक राहणार आहे. पण सेनेने अगोदरच चार अपक्ष नगरसेवकांकडून सेनेला पाठिंबा असल्याचे पत्र घेऊन त्याची कोकण आयुक्तांकडे नोंद केली आहे. त्यामुळे अपक्ष नगरसेवकांना फोडणे भाजपाला शक्य नाही. पालिकेत अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ 88 होते. पण चंगेश मुलतानी या अपक्ष नगरसेवकाचे पद रद्द झाल्यामुळे शिवसेनेकडे 87 नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे अपक्ष नगरसेवकांसह 84 नगरसेवक आहेत. हे संख्याबळ कांदिवली पोटनिवडणूकीनंतर 85 होईल. त्यामुळे पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना अजून चार नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे भाजपाला सध्यातरी, तरी पालिकेतील सत्तेपासून दूरच राहावे लागणार आहे.