Tue, Apr 23, 2019 06:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीमंत मुंबई महापालिकेवर एफडी मोडण्याची वेळ आली

श्रीमंत महापालिकेवर एफडी मोडण्याची वेळ आली

Published On: Feb 04 2018 2:16AM | Last Updated: Feb 04 2018 2:16AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

शहरातील  विविध पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने आता मुदतठेवींचा वापर करण्याचे ठरवले आहे. 69 हजार 135 कोटी रुपयांच्या ठेवींपैकी 2 हजार 744 कोटी रुपये विविध कामांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे मुदतठेवींतून विकासकामे करण्याची सूचना भाजपने दोन वर्षांपूर्वी केली होती. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेत जोरदार टीका केली होती. आता शिवसेनेनेच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. 

शुक्रवारी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शहरात मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असल्याने खर्चात  8 टक्क्यांनी वाढ सुचवण्यात आली आहे. मात्र महापालिकेने कोणत्याही करात वाढ न करण्याचे ठरवल्याने या वाढीव खर्चासाठी मुदतठेवींचा आधार घ्यावा लागणार आहे. 

पालिकेचा खर्च वाढत चालला आहे, मात्र दुसरीकडे उत्पन्नात म्हणावी तशी वाढ झालेली नाही त्यामुळे विकासकामे मार्गी लावण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

मोठ्या उद्योगांसाठी देण्यात येणार्‍या परवाना शुल्कात वाढ सुचवण्यात आली आहे. त्याचबरोबर पालिकेच्या रुग्णालयांत करण्यात येणार्‍या उपचारांचे शुल्कदेखील वाढवण्याचे ठरवण्यात आले आहे. पालिकेचा खर्च भागवण्यासाठी ही वाढ करणे गरजेचे असल्याचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. 

आगामी आर्थिक वर्षात रस्त्यांची कामे आणि सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सर्वाधिक निधी लागणार आहे. सार्वजनिक कामांसाठी एकूण 9 हजार 522 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी कोस्टल रोडसाठी 1500 कोटी रुपये, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी रस्त्यांच्या कामांसाठी 1 हजार 79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती ती वाढून यावर्षी या कामांसाठी 1 हजार 202 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गेल्या वर्षी 446 कोटी रुपये खर्ची पडले होते. यावर्षी त्यासाठी 566 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हा खर्च वाढल्यामुळे पालिकेने आपला मोहरा मुदत ठेवींकडे वळवला आहे. 

गेल्या वर्षीच्या 29 ऑगस्ट रोजी पडलेल्या प्रचंड पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तब्बल 146 धोकादायक ठिकाणांची नोंद करण्यात आली होती. यापैकी 55 ठिकाणांचा आगामी पावसाळ्यापूर्वी बंदोबस्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी 54 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. 

तानसा जलवाहिनीशी समांतर असा सायकल आणि धावण्याचा मार्ग तयार करण्यात येणार आहे.  हा मार्ग काही लोकल, मेट्रो आणि मोनो मार्गावरील स्थानकांना जोडला जाईल. या मार्गासाठी 100 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.