Wed, Jul 24, 2019 08:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई महापालिकेच्या ७ मराठी शाळा बंद !

मुंबई महापालिकेच्या ७ मराठी शाळा बंद !

Published On: Jan 30 2018 2:16AM | Last Updated: Jan 30 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेच्या सात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या आहेत. पटसंख्या घसरल्यामुळे या शाळा बंद करून त्यांचे अन्य मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनच मराठी शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष देत नसल्यामुळे त्या बंद पडत असल्याचा आरोप, सोमवारी शिक्षण समितीत करण्यात आला. 

इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत असल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. पालिकेच्या 50 पेक्षा जास्त मराठी शाळांमधील पटसंख्या 100 पेक्षा कमी असून काही शाळांची पटसंख्या 25 पेक्षा खाली आली आहे. अशा शाळांचे अन्य शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचे धोरण पालिकेच्या शिक्षण विभागाने स्वीकारले आहे. त्यामुळे मलबार हिल येथील खंबाला हिल मराठी शाळेसह दादर भवानी शंकर रोड, सहकारनगर वडाळा, कस्तुरबा गांधी वरळी मराठी शाळा, चंडीका संस्थान काळाचौकी, गणपतराव कदम मार्ग मराठी शाळा व धोबीघाट मराठी शाळा बंद करण्यात येणार आहेत. 

याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या मंजूरीसाठी आला असता, मराठी शाळा बंद पडत असल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठी शाळा मुंबईतून हद्दपार करण्यासाठी पालिका प्रशासनच प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाच्या आरती पुगावकर यांनी केला. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असला तरी, विद्यार्थ्यांची संख्या घटू नये यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने काय प्रयत्न केले, हे जाहीर करावे, अशी मागणीही सदस्यांनी लावून धरली. पालिका शाळांमध्ये आता इंग्रजी भाषेला प्रथम स्थान !

पालिका शाळांमध्ये आता इंग्रजी भाषेला प्रथम स्थान !

मुंबई : राजेश सावंत 

महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना, मराठी भाषेला प्रथम स्थान असून तसे धोरणही निश्‍चित करण्यात आले आहे. पण पालिकेच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक प्रसिध्द करून, प्राथमिक शाळांमध्ये पहिलीपासून चक्क इंग्रजी भाषेला प्रथम स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेत गेली 20 वर्षे सत्ता भोगणार्‍या सत्ताधारी शिवसेनेची मोठी नाचक्की झाली आहे. 

मुंबई महापालिकेचा संपूर्ण कारभार मराठी भाषेत चालत असताना, दुसरीकडे मराठी भाषेचा गळा घोटण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू आहेत. पण मराठी मतांवर निवडून येणार्‍या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने व्यवहारात इंग्रजी भाषेचे महत्व लक्षात घेऊन, पालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला प्रथम  स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर, जून 2017 मध्ये शिवसेनेचा अध्यक्ष असलेल्या शिक्षण समितीच्या मंजूरीने 58 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. या 58 शाळांमध्ये तृतीय स्थानावर असलेल्या इंग्रजी भाषेला प्रथम दर्जा देण्यात आला आहे. तर टप्प्याटप्प्याने सर्व माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळांमध्ये 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून इंग्रजी ही प्रथम भाषा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर दुसरी व त्या पुढील वर्गामध्ये इंग्रजी या विषयाला प्रथम भाषा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी पालिकेने शिक्षण समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. 

पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही पालिका प्रशासनाने इंग्रजी भाषेला प्रथम स्थान देण्याचा निर्णय घेऊन, मोठा धक्काच दिला आहे. दरम्यान कामगार नेते के. पी. नाईक यांनी इंग्रजीला प्रथम भाषेचे स्थान देण्यास जोरदार विरोध केला आहे. नाईक यांच्या विरोधामुळे शिवसेना झोपेतून जागी झाली आहे. त्यामुळे सोमवारी प्रशासनाने मान्यतेसाठी आणलेला प्रस्ताव शिक्षण समितीत राखून ठेवण्यात आला. दरम्यान मराठी मातृभाषेचे शिक्षण संपवून नजीकच्या काळात मराठी भाषिक शाळा संपवण्याचे प्रशासनाचे कट कारस्थान असल्याचा आरोप यावेळी नाईक यांनी केला आहे.

मराठी भाषेचे स्थान अबाधित राहणार : शिक्षण विभाग

मराठी भाषेसोबत इंग्रजी भाषेला प्रथम स्थान देण्याने मराठी भाषेचे महत्व कमी होत नाही. मराठी भाषेचे उच्च स्थान कायमच राहणार आहे. गणित व विज्ञान विषय वगळता अन्य विषय मराठी माध्यमातूनच शिकवण्यात येतात. त्यामुळे मराठी शाळांमध्ये मराठी ही प्रथम भाषा आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेसह इंग्रजी भाषेतून होणार्‍या विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना सहजपणे सामोरे जाण्यासाठी इंग्रजी भाषेला प्रथम स्थान देणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेला तृतीय स्थान असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी भाषेकडे झुकत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रसिध्द केलेले परिपत्रक मराठी भाषा टिकवण्यासाठी असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.