Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेने केलेला गेम भाजपला समजलाच नाही

शिवसेनेने केलेला गेम भाजपला समजलाच नाही

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 10:26AMमुंबई : राजेश सावंत

मनसेच्या सहा नगरसेवकांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाल्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. मनसे नगरसेवकांचा प्रवेश लांबणीवर टाकण्यासाठी भाजपाने अप्रत्यक्षरित्या मनसेला मदत केली. पण शिवसेनेच्या शिलेदारांनी भाजपाचा गेम कधी केला हे समजलेच नाही. शिलेदारांच्या गमिनी काव्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला चार वर्षे कोणीच हलवू शकणार नाही.

भाजपाला गेल्या 11 महिन्यांत शिवसेनेने अनेक धक्के दिले आहेत. शिवसेनेपेक्षा नगरसेवकांचे संख्याबळ अवघे दोनने कमी असल्यामुळे अन्य पक्षातील नगरसेवकांना भाजपाने गळाला लावण्याचा प्रयत्न केला. विशेषत: मनसेच्या नगरसेवकांना भाजपात आणण्यासाठी फासेही टाकण्यात आले होते. एवढेच नाही तर, मनसेने भाजपाला पाठिंबा देण्याची गळ घातली होती. राष्ट्रवादी काँग्रेससोबतही बोलणी सुरू होती. पण दोन्ही पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात भांडूप महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या दिवंगत नगरसेविका प्रतिमा पाटील कुटुंबालाच गळाला लावले. त्यांच्या सुनेला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयामुळे भाजपा सत्तेच्या जवळ पोहचला. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही पालिकेत भाजपाची सत्ता येणार, असे जाहीरच करून टाकले होते. पण अचानक मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेशानंतर दुसर्‍या दिवशीच भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. त्यानंतर लगेचच मनसेने सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाला आक्षेप घेत, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली. या मागेही भाजपाची रणनीती होती, असे बोलले जात आहे. तीन महिने कोकण आयुक्तांकडे फेर्‍या मारून कोकण आयुक्तांनी अटींवर मनसे नगरसेवकांच्या सेना विलीनीकरणाला मंजुरी दिली. त्यानंतर तासाभरात पालिका सभागृहात मनसे नगरसेवक विलीनीकरणाची महापौरांनी घोषणा केली. त्यामुळे कोकण आयुक्तांच्या निर्णयाविरोधात हालचालीस भाजपाला संधीच मिळाली नाही. आता सेनेच्या नगरसेवकांची संख्या 93 वर पोहोचली आहे. 85 नगरसेवकांचे पाठबळ असलेल्या भाजपाला पालिकेतील सत्तेसाठी सेनेला ओलांडणे शक्य होणार नाही.