Sat, Sep 22, 2018 22:17



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिलचा मालक रमेश गोवानी गजाआड

कमला मिलचा मालक रमेश गोवानी गजाआड

Published On: Jan 23 2018 1:51AM | Last Updated: Jan 23 2018 1:28AM



मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी कमला मिलचा मालक व संचालक रमेश गोवानी याला सोमवारी रात्री जेरबंद केले. गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्यानंतर गोवानी याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याला मंगळवारी भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी वन अबव्हचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह मोजोस बिस्त्रोचे मालक युग पाठक व युग थुली, आरोपींना आश्रय देत पळून जाण्यात मदत करणारा विशाल कारीया यांच्यापाठोपाठ शनिवारी रात्री कमला मिलचा भागीदार रवी भंडारी, अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील आणि दोन्ही रेस्टोपबला हुक्का पुरविणार्‍या उत्कर्ष पांडे याला अटक केली होती. 

आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या दोन्ही रेस्टोपबमध्ये अवैधरीच्या हुक्का पार्लर चालविण्यासोबत अवैधरीत्या करण्यात आलेल्या बांधकामाची माहिती गोवानीला होती. तरीही त्याने निष्काळजीपणे याकडे दुर्लक्ष केला. आरोपींच्या चौकशीतून गोवानी याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने चौकशीअंती सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आल्याचे अप्पर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी सांगितले.