Mon, Sep 24, 2018 11:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाण्यात रेशन दुकानांत मिळणार दूध

मुंबई, ठाण्यात रेशन दुकानांत मिळणार दूध

Published On: Jan 20 2018 1:50AM | Last Updated: Jan 20 2018 1:49AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

ठाणे व मुंबईमधील शिधावाटप दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना या दुकानांमध्ये महानंदचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात  आली आहे. राज्यातील शिधावाटप दुकानांमधून सध्या गहू आणि तांदूळ विक्री केली जात होते. कमिशनमधून मिळणार्‍या उत्पन्नातून कर्मचार्‍यांचे पगार, दुकानांचे भाडे, वीजबिल देणे दिवसेंदिवस अशक्य होऊ लागल्यामुळे त्यांनी शासनाकडे मागणी केल्यानंतर चणाडाळ, भाजीपाला, रवा, शेंगदाणे इत्यादी खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. 

मुंबई व ठाण्यातील जनतेला या सर्व वस्तू आपल्या परिसरात सहजासहजी उपलब्ध होतात. त्यामुळे शासनाच्या या आदेशाचा या दोन प्रमुख शहरातील शिधावाटप दुकानदारांना विशेष लाभ होत नव्हता. या शहरातील दुकानदारांची मागणी तसेच महानंदा दुग्ध संस्थेलाही ग्राहक मिळावेत, या हेतूने मुंबई व ठाण्यातील शिधावाटप दुकानांमध्ये महानंदचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महानंद दुग्धशाळेच्या अधिकृत वितरकांमार्फत रास्तभाव दुकानांपर्यंत हे पदार्थ वितरीत केले जाणार आहेत. हा व्यवहार दुग्धशाळा व संबंधित रास्तभाव दुकानदारांमध्ये राहील, असेही अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.