Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वृक्षतोडीच्या स्थगितीमुळे मेट्रोचे काम मंदावले

वृक्षतोडीच्या स्थगितीमुळे मेट्रोचे काम मंदावले

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईमध्ये विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे करण्यात येणार्‍या वृक्षतोडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मेट्रोचे कामही मंदावणार आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत ही बंदी घालण्यात आल्याने तोपर्यंत तरी या कामाची गती कमी होणार आहे. मात्र आम्ही मेट्रो मार्गिकेमध्ये बाधित होणार्‍या झाडांसाठी नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये विकासकामांमध्ये बाधित होणार्‍या झाडांना तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडून देण्यात येणार्‍या परवानगीच्या प्रक्रियेविरोधात असल्याचे सेव्ह आरे संघटनेचे सदस्य झोरू बाथेना यांनी स्पष्ट केले.

फक्त मेट्रोच नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या कामांकरिताही झाडांवर कुर्‍हाड चालवली जात असल्याचा आरोप बाथेना यांनी याचिकेमध्ये केला होता. या याचिकेवर सुनावणी देताना मंगळवारी हायकोर्टाने प्रशासनाची खरडपट्टी काढत झाडांच्या कत्तलीवर बंदी घातली होती. यानंतर उच्च न्यायालयाने ही बंदी 21 फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली. तसेच यापुढे झाडे तोडण्याआधी त्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करा असे आदेशही दिले. यामुळे काही काळासाठी तरी मेट्रो मार्गिकेचे काम मंदावणार आहे. 25 झाडांपेक्षा कमी झाडांची कत्तल करायची असेल तर महापालिका आयुक्तांच्या मंजुरीने झाडांची तोड करता येते.

जर 25 च्या वर झाडे तोडायची असतील तर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी लागते. यामुळे बहुतांश वेळेस 25 पेक्षा कमी झाडांचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतो आणि त्यास मंजुरी मिळते, आमचा या प्रक्रियेला विरोध असल्याचे बाथेना यावेळी म्हणाले. तसेच या महिन्याभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे तब्बल 42 प्रस्ताव वृक्षतोडणीची मंजुरी मिळावी म्हणून गेले आहेत. यातील तीन प्रस्ताव मेट्रो मार्गिकेच्या तोडणीसाठी गेले असल्याचेही बाथेना यावेळी म्हणाले.