Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रोमुळे तुंबणार मुंबई; आयुक्‍तांचाच इशारा

मेट्रोमुळे तुंबणार मुंबई; आयुक्‍तांचाच इशारा

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. ठिकठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, बुजवण्यात आलेली गटारे यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल घेत, पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्या यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या कामांनी वेग घेतला आहे. पण या प्रकल्पांतर्गंत मुंबई शहरासह पश्‍चिम उपनगरात ठिकठिकाणी चर, मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवणे शक्य नाही. विशेष म्हणजे या कामादरम्यान पावसाळी पाण्याचा निचरा होणारी गटारे व छोटे नाले बुजले आहेत. त्यामुळे पावसाळ्याचा पाण्याचा  तातडीने निचरा होणे अशक्य असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

या कामांची खुद्द पालिका आयुक्तांनी दखल घेतली आहे. उपायुक्तांच्या मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी मेट्रो रेल्वेच्या कामांकडे अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असणार्‍या मेट्रो रेल्वे कामासह अन्य मोठ्या कामांना स्वतः भेट देऊन पाहणी करावी. या पाहणीदरम्यान प्रामुख्याने सदर कामांमुळे जवळपासच्या परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना आखण्यात याव्यात. परिसरातील पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याच्या दृष्टीने संबंधितांकडून आवश्यक ती कार्यवाही करवून घेणे अपेक्षित असल्याचेही आयुक्तांनी यावेळी उपायुक्तांना सांगितले. 

पाणी तुंबू नये यासाठी पंप बसवणार 

मेट्रो रेल्वेसह उड्डाणपूल व पादचारी पुलाच्या कामांची पाहणी करून त्याचा अहवाल येत्या आठवडाभरात सादर करण्यात येणार आहे. या अहवालानुसार नेमके कुठे पाणी तुंबणार याची माहिती घेऊन पाणी उपसाचे पंप बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय जेथे मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी काही कामगारांचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 

Tags : Mumbai Metro issue, Commissioner warning, Mumbai news,