Fri, Apr 19, 2019 12:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तीन लाख उंदीर नव्हे, गोळ्या;  खडसेंच्या आरोपांवर खुलासा

तीन लाख उंदीर नव्हे, गोळ्या;  खडसेंच्या आरोपांवर खुलासा

Published On: Mar 24 2018 2:06AM | Last Updated: Mar 24 2018 2:04AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मंत्रालयात उंदीर मारण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला होता. अवघ्या सात दिवसांत 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारलेच कसे, असा सवाल खडसे यांनी केला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने हा आरोप फेटाळून लावत, ही संख्या उंदरांची नसून ते मारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या गोळ्यांची आहे. तसेच या कामावर फक्‍त 4 लाख 79 हजार रुपयेच खर्च झाल्याचे स्पष्ट केले आहे. 

मंत्रालयात उंदीर मारण्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी सभागृहात करून खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे भाजपच्या आमदारांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेली ही माहिती एकनाथ खडसे यांनीच सभागृहात दिल्याने भाजपची कोंडी झाली होती. या घोटाळ्याची चर्चा सर्वत्र असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खुलासा करीत कोणताही घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट केले. 

मंत्रालय आणि अ‍ॅनेक्स इमारतीमधील उंदीर मारण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या. दोन्ही निविदा या 3 मे 2016 रोजी मे. विनायक मजूर सहकारी संस्थेला देण्यात आल्या. या दोन्ही निविदांप्रमाणे उंदीर मारण्यासाठी एकूण 3 लाख 19 हजार 400 इतक्या गोळ्या पुरविण्यात आल्या. माहितीच्या अधिकारात देण्यात आलेल्या उत्तरातदेखील हेच नमूद करण्यात आले आहे. त्याचा अर्थ 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारणे असा नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. 
 

 

tags : Mumbai,news, Mantralaya rats allegation of corruption eknath khadse state government give clarification