Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, कोकण पदवीधर स्वबळावर लढणार सेना

मुंबई, कोकण पदवीधर स्वबळावर लढणार सेना

Published On: Apr 27 2018 1:39AM | Last Updated: Apr 27 2018 1:34AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना आमदार आणि प्रमुख पदाधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविला त्याप्रमाणे या निवडणुकांमध्येही विजय मिळविण्याचे आदेश त्यांनी दिले. 

मुंबई पदवीधर मतदारसंघात सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे सातत्याने निवडून येत आहेत. यावेळीही शिवसेनेकडून त्यांनाच उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत. या दोन्ही निवडणुका शिवसेनेने गांभिर्याने घेतल्या आहेत. उध्दव ठाकरे यांनी या दोन्ही मतदारसंघातील मंत्री, आमदार व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला युवा सेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, खा. अनिल देसाई आदी उपस्थित होते. ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला. 

कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला सुरुंग लावला. निरंजन डावखरे यांनी भाजपच्या संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती ही वेगळी होती. सध्या माजी मंत्री नारायण राणे भाजपसोबत आले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये 
प्रवेश केला. 

ठाण्यात भाजपचे नगरसेवकही वाढले. त्यामुळे भाजपची ताकद काहीशी वाढली आहे. मात्र, शिवसेनेनेही ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी केली असल्याने भाजपला ही निवडणूक सोपी राहीलेली नाही.

Tags : Mumbai, Mumbai news, Mumbai, Konkan Graduate, Constituency Ele