Sat, Jul 20, 2019 15:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-कोल्हापूर/नाशिक विमानसेवेचा मुहूर्त ठरला!

मुंबई-कोल्हापूर/नाशिक विमानसेवेचा मुहूर्त ठरला!

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:53AM

बुकमार्क करा

मुंबई /कोल्हापूर : प्रतिनिधी

एअर डेक्कन या प्रादेशिक हवाई प्रवासी वाहतूक करणार्‍या देशी कंपनीतर्फे 22 डिसेंबर रोजी मुंबई-नाशिक, मुंबई-जळगाव तर मुंबई - कोल्हापूर हवाई प्रवासी वाहतुकीला 24 डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. 

कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा 24 डिसेंबरपासून सुरू होत आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार व रविवारी ही सेवा उपलब्ध असेल. मुंबईहून कोल्हापुरला दुपारी सव्वा वाजता विमान निघून ते अडीच वाजता पोहोचेल आणि तेच विमान  कोल्हापुरहून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी निघून चार वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईत उतरेल. केंद्र शासनाच्या उडान योजनेतून ही सेवा उपलब्ध झाली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. या विमानसेवेसाठी तिकिट बुकिंगला गुरुवारी (21 डिसेंबर) प्रारंभ होत आहे. विमान सेवा सुरू होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर डेक्कनच्या अधिकार्‍यांनी बुधवारी दिल्याचे खा. संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. गेली सहा वर्षे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद होती.

ही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. छोटी शहरे विमान सेवेने जोडण्याच्या केंद्र शासनाच्या उडाण योजनेची घोषणा झाल्यानंतर त्यात कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. त्यानंतरही वाहतूक परवाना आणि मुंबई विमानतळावरील वेळापत्रक (स्लॉट) मिळण्यासाठी विलंब होत राहिला. त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गणपती राजू यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या आदेशानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरण व नागरी उड्डाण संचालनालयाने ऑक्टोबरमध्ये उजळाईवाडी विमानतळाची संयुक्त पाहणी केली होती. रखडलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेबाबत आपण मंत्री अशोक गणपती राजू यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते, असे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.