होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हॉटेलमालकच नव्हे तर मुंबई मनपा देखील तेवढीच जबाबदार

कमला मिल दुर्घटनेची CBI चौकशी करा: विखे-पाटील

Published On: Dec 29 2017 3:01PM | Last Updated: Dec 29 2017 3:01PM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल्सला आग लागून झालेल्या दुर्घटनेतील १५ जणांचा मृत्यू  झाला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराने १५ जणांचा बळी घेतला, अशी टिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना या अव्यवस्थेमुळे किंमत मोजावी लागणार, असा संतप्त प्रश्न विखे-पाटील यांनी उपस्थित केला. कमला मिल अग्नितांडव व मुबंईतील अन्य आगीच्या घटनांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. गुरूवारी मध्यरात्री घडलेल्या अग्नीतांडवातील पीडितांच्या कुटुंबीयांप्रती विखे-पाटील यांनी संवेदना व्यक्त केली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकार व मुंबई महापालिकेवर तोफ डागली,  ते म्हणाले की,  "पोलिसांनी संबंधित हॉटेलमालकांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, या घटनेसाठी हॉटेलमालकांसोबतच महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत सारेच दोषी आहेत. या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले होते. बांधकामामध्ये आगीला पोषक असे साहित्य मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याठिकाणी कोणतीही सक्षम यंत्राणा नव्हती. शिवाय आगीची दुर्घटना घडल्यास  बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्ग देखील उपलब्ध नव्हता. या सर्व त्रुटींसाठी केवळ हॉटेलमालकच नव्हे तर मुंबई मनपा देखील तेवढीच जबाबदार आहे."

येथील अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून १५ जणांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरल्याबद्दल मनपा अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. या अग्नितांडवाची मुंबई महापालिका आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या निर्णयावरही त्यांनी टिकेची झोड उठवली. ते म्हणाले की, "मुळातच या घटनेसाठी सर्वप्रथम मुंबई महानगर पालिकाच जबाबदार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांकडून चौकशी करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी ठरेल. या घटनेची आयुक्तांमार्फत होणारी चौकशी आम्हाला मान्य नसून, मागील २ वर्षात मुंबईत इमारती कोसळून व आगी लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या सर्वच घटनांची सीबीआयमार्फत चौकशी करावी." अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

मुंबईत सध्या सुरू असलेल्या हॉटेल्समध्ये ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात आहे. त्याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला वेळ नाही. त्यांचे नेते रूफ टॉप हॉटेल्सचा आणखी एक बालहट्ट धरून बसले आहेत. कमला मील कंपाऊंडमधील हॉटेलदेखील छतावर होते. पण आग लागल्यानंतर खाली उतरायला जागाच नसल्याने अनेकांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. शिवसेना नेत्यांच्या रूफ टॉप हॉटेलच्या धोरणामुळे हा आगीच्या घटनांचा धोका अधिक वाढण्याची भीती विखे पाटील यांनी व्यक्त केली.