Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनच्या रुळांवर खास थर्मामीटर

बुलेट ट्रेनच्या रुळांवर खास थर्मामीटर

Published On: Apr 07 2018 2:11AM | Last Updated: Apr 07 2018 1:49AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित असलेल्या बुलेट ट्रेनच्या रुळांची देखभाल करण्यासाठी जपानचे तंत्र वापरण्यात येणार आहे. यामध्ये रुळांना तडे जाऊ नयेत यासाठी दर शंभर किलोमीटरमागे पाच ठिकाणी रुळांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर बसविण्यात येणार आहेत. ताशी 320 किमीच्या वेगाने धावणार्‍या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या रुळांच्या तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी खास तंत्र वापरण्यात येणार आहे. 

ट्रॅकच्या तापमानाची मोजणी करण्यासाठी ट्रॅकला रेल टेम्प्रेचर सेन्सर बसविण्यात येणार आहेत. किमान 5 डिग्री ते कमाल 70 डिग्रीपर्यंतच्या तापमानाची नोंद केली जाणार आहे. किमान तापमानापेक्षा 40 डिग्रीने तापमान वाढले किंवा कमाल तापमानाच्या 40 डिग्रीने तापमान खाली आले तर विशेष काळजी घेण्याचे संदेश देण्यात येणार आहे. तसेच रेल डिफेक्ट डिटेक्शन कारही चालविण्यात येणार आहे. दर पाच मीटरच्या रुळांवर रेल टर्नओव्हर डिव्हाईस बसविण्यात येणार आहेत.

पावसाची पातळी मोजण्यासाठी विशेषतः बोगद्यांच्या तोंडाशी सहा ठिकाणांवर पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहेत. ग्राऊंड पातळीवर मेण्टेनन्सची कामे नीट झाली आहेत का हे पाहण्यासाठी बुलेट ट्रेनच्या प्रवासापूर्वी सेफ्टी कन्फर्मेशन कार चालविण्यात येणार आहे. तसेच कुठे भिंतींना फटी आहेत का हे तपासण्यासाठी टनेल लिनिंग स्कॅनिंग कार चालविण्यात येईल.