Thu, Jan 17, 2019 22:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अविकसित  भागांत होणार मोठी गुंतवणूक

अविकसित  भागांत होणार मोठी गुंतवणूक

Published On: Feb 21 2018 2:06AM | Last Updated: Feb 21 2018 1:50AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मॅग्‍नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018 च्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपये गुंतवणुकीचे 4 हजार 106 सामंजस्य करार झाले आहेत. त्यामधून 36 लाख 77 हजार 185 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेषत:, राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरू असलेल्या मॅग्‍नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन 2018 जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमीत मल्‍लिक, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यावेळी उपस्थित होते.

यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर 60 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या व राज्य सरकार व भारतीय रेल्वे यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मॅग्‍नेटिक महाराष्ट्राला प्रचंड यश मिळाले आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या समीटमध्ये एकूण 4 हजार 106 सामंजस्य करार झाले.