Thu, Jul 18, 2019 12:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत आता सदनिकानिहाय मालमत्ता कर

मुंबईत आता सदनिकानिहाय मालमत्ता कर

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 7:38AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता कर आकारण्यात येतो. त्यामुळे एखाद्या सदनिकाधारकाने मालमत्ता कर भरला नाही तर, त्या सोसायटीवर कारवाई करण्यात येते. यासाठी सदनिकानिहाय मालमत्ता कर आकारण्याचा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकांनी धरला आहे. याबाबतचा ठराव शुक्रवारी महापालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. पालिका अधिनियम 1888 च्या कलम 139 अ (1) अन्वये मालमत्ता करात पाणीपट्टी, पाणी लाभ कर, मलनि:सारण कर, सर्वसाधारण कर, शिक्षण उपकर, पदपथ व सुधार कर आकारण्यात येतो. इमारतीचे ताबा प्रमाणपत्र 

(ओसी) दिल्यानंतर सदनिकानिहाय मालमत्ता कर आकारणे आवश्यक आहे. परंतु पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागातर्फे गृहनिर्माण सोसायटीला मालमत्ता कर लावण्यात येतो. इमारतीमधील काही सदस्य सोसायटीकडे विहित कालावधीत आपला मालमत्ता कर भरत नाहीत. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटीकडून कर भरण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांना पालिका नोटीस बजावून कर भरण्यासाठी पाठपुरावा करते. एवढेच नाही तर त्या इमारतीला दंड आकारणे, त्यांची जलजोडणी खंडित करणे आदी कारवाई करण्यात येते. याचा त्रास नियमित कर भरणार्‍या सदनिकाधारकांना होतो. हे थांबवण्यासाठी सदनिकानिहाय करआकारणी करण्यात यावी, अशी ठरावाची सूचना शुक्रवारी शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी पालिका सभागृहात सादर केली.  

या सूचनेला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी पाठिंबा देत, सदनिकानिहाय मालमत्ता करआकारणी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. एवढेच नाही तर, ज्या इमारतींना ओसी मिळाली नाही, अशा सोसायट्यांनाही सदनिकानिहाय मालमत्ता कर आकारण्यात यावा, अशी उपसूचना कोटक यांनी मांडली. याला सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सदनिकानिहाय मालमत्ता कर आकारण्याचा ठराव मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवला असता, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.