Thu, Jun 27, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयपीएलला पुढील पाच वर्षे अतिरिक्त पाणीपुरवठा नाही

आयपीएलला पुढील पाच वर्षे अतिरिक्त पाणीपुरवठा नाही

Published On: Apr 07 2018 2:11AM | Last Updated: Apr 07 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात पाण्याच्या दुष्काळाचे संकट असेल तर  इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) क्रिकेट सामन्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमला यापुढे पाच वर्षे  अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे हमीपत्र मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिले.  नव्या पाणीवाटप धोरणानुसार राज्य सरकारने विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना त्यांच्या मैदानाची देखभाल करण्यासाठी सिंचनाचे पाणी वापरण्याची परवानगी दिल्याने उच्च न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त करून सरकारची सध्याची वाटप योजना काय आहे, असा सवाल उपस्थित केला. तसेच एका आठवड्यात त्यासंदर्भात माहिती देण्याचे आदेशही राज्य सरकारला दिले.

काही सामाजिक संस्थांनी राज्यातील काही भाग भीषण दुष्काळाचा सामना करत असताना आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा केला जातो़  खेळपट्टीच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो, याकडे लक्ष वेधणार्‍या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. सुरेश पाकळे यांनी पुढील पाच वर्षांत अतिरिक्त पाणी देणार नसल्याचे हमीपत्रच न्यायालयात सादर केले.

यावेळी राज्य सरकारने  नवीन पाणीवाटप योजना ताहीर केली असून विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना त्यांच्या मैदानाची देखभाल करण्यासाठी सिंचनाचे पाणी वापरण्याची परवानगी दिल्याची खळबळजनक माहिती न्यायालयाला दिली.  याची दखल न्यायालयाने घेऊन राज्य सरकारला पाणीवाटपाचे नेमक नवीन धोरण काय  आहे, असा सवाल उपस्थित करून  जुने आणि नवी धोरण सादर करण्याचे आदेश देऊन याचिकेची पुढील सुनावणी 13 एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली.