मुंबईवर ‘निसर्ग’कृपा!

Last Updated: Jun 04 2020 1:21AM
Responsive image


मुंबई/रायगड/पुणे : पुढारी वृत्तसेवा

120 किलोमीटर ताशी वेगाने निघालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास अलिबाग-मुरूडच्या मध्यात धडकले आणि वादळी वारे, मुसळधार पावसाचे तांडवच सुरू झाले. रायगड जिल्ह्यात किमान 2000 झाडे उन्मळून पडली आणि घरादारांचे, शेतीवाडीचे कोट्यवधींचे नुकसान झाले, असा अंदाज आहे. अलिबाग तालुक्यात उमटे या गावी विजेचा खांब कोसळून दशरथ वाघमारे हा ठार झाला. रायगडच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर हे चक्रीवादळ मुंबई, ठाणे, पालघरमार्गे गुजरातकडे वळणार होते. मात्र, सायंकाळी 7 च्या सुमारास या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आणि ते पुण्याकडे सरकले. मुंबई, ठाणे, पालघरकडे न जाता पुणेमार्गे उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून ते मध्य प्रदेशकडे सरकणार आहे. अर्थात, या चक्रीवादळाचे काही झटके मुंबई, ठाणे परिसराला नक्कीच बसले. दुपारनंतर 75 ते 80 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू लागले आणि मुुंबई शहर, उपनगरांत असंख्य झाडे उन्मळून पडली, फांद्या तुटून गाड्यांवर पडल्या. वरळी, जुहू, वेसावे समुद्र किनार्‍यालगतच्या इमारती, बैठ्या चाळी व झोपड्यांवरील पत्रे उडाले. निसर्ग चक्रीवादळाने उत्तर रत्नागिरीतील दापोली, मंडणगड, गुहागर व काही प्रमाणात चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्याला तडाखा दिला असून, समुद्राला उधाण आले होते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने  निसर्ग चक्रीवादळाबाबत बुधवारी (दि. 3) सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तेरा बुलेटिन प्रसिद्ध केली. त्यामध्ये दिवसभरात चक्रीवादळाचे अपडेट देण्यात आले होते. तसेच वार्‍यांचा वेग कसा राहिला, याचीही तंतोतंत माहिती देण्यात आली होती. तेराव्या बुलेटिनमध्ये मात्र हे चक्रीवादळ अलिबागहून पुढे पुणेमार्गे मध्य प्रदेशकडे सरकले. त्यावेळी या चक्रीवादळाचा वेग ताशी 80 कि.मी. असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी या चक्रीवादळाचा वेग कमी होणार असून, त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मुरूड व अलिबाग या जवळपास 120 कि.मी.च्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दुपारी एकच्या सुमारास धडकण्यापूर्वीच त्याच्या आगमनाची वार्ता घेऊन वादळी वारे वाहू लागले होते. या वार्‍यांच्या तडाख्यामुळे 2 हजारांवर झाडे उन्मळून पडली. चक्रीवादळ एक वाजता धडकले, अशी अधिकृत घोषणा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली. लँडफॉलनंतर वादळ सेटलिंग टाईम तीन तासांचा होता. या तीन तासांत वार्‍यांचा वेग कमी होणे अपेक्षित होते. त्यानुसार अलिबागमध्ये 3.45 वाजता वार्‍यांचा वेग पूर्णपणे कमी झाला. मात्र, दिवसभर या वादळाने घातलेल्या धिंगाण्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, महाड-पंढरपूर राज्यमार्ग, महाड एमआयडीसीमधील अंतर्गत रस्ते, या ठिकाणी निसर्ग वादळात वृक्ष पडले. महाड एमआयडीसीमधील काही कारखान्यांमधूनदेखील झाडांची पडझड झाली. माथेरानमध्येही या वादळाने थैमान घातले आणि असंख्य घरांचे पत्रे उडवले. दुपारी एकपासून सुरू झालेल्या वादळी पावसात शहरात ठिकठिकाणी झाडे व झाड्यांच्या फांद्या पडल्या होत्या. 

अनेकांच्या कौलारू घरांवरील छप्पर उडून गेले, तर अनेकांच्या बिल्डिंग, सोसायट्यांवरील पत्रेदेखील उडून गेले आहेत.  या वादळामुळे शहरासह ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी विद्युतखांब पडले आहेत, बर्‍याच ठिकाणी झाडेदेखील उन्मळून पडली आहेत. किनारपट्टीच्या गावांतील एकूण 13,565 नागरिकांना आधीच स्थलांतरित करण्यात  आल्याने ते सारेच सुरक्षित राहिले. मोठी पडझड होऊनदेखील कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

मुंबईत वादळी वार्‍यासह पाऊस

चक्रीवादळ पुण्याकडे सरकले तरी या चक्रीवादळाचे तडाखे मुंबईला बुधवारी दुपारपासून बसत राहिले. वादळामुळे सुटलेल्या ताशी 75 ते 80 कि.मी. वार्‍यांमुळे  ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आणि असंख्य गाड्यांचे नुकसान झाले. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

दुपारी वादळी वार्‍यांसह पाऊस कोसळू लागताच खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-बांद्रा सी लिंकवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. मुंबईत आधीच लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. पश्चिम मध्य रेल्वेची उपनगरीय सेवाही बंद असल्यामुळे वादळाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, वार्‍यामुळे शहर व उपनगरांत सुमारे 120 ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडून गाड्यांचे नुकसान झाले. शहरात एक-दोन ठिकाणी जुन्या घरांच्या भिंती व संरक्षक भिंत पडल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. मात्र, यामुळे कुठेही जीवितहानी झालेली नाही.

किनार्‍यालगतच्या बोटींचे नुकसान

सोसाट्याचा वारा त्यामुळे कुलाबा, वेसावे, जुहू, वरळी, कोळीवाडा समुद्र किनार्‍यालगत उभ्या असलेल्या बोटींचे नुकसान झाले. वार्‍यामुळे लाटांवर तरंगणार्‍या बोटी एकमेकांवर आदळल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. त्यात वार्‍यामुळे बोटींना बांधलेला दोर सुटण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना वादळातही बोट वाहून जाऊ नये, म्हणून एकसारखे दोर बांधावे लागत होते. मात्र, या वादळामुळे  बोटींचे नेमके किती नुकसान झाले, हे समजू शकले नाही.

वादळाला तोंड देण्यासाठी मुंबईतील पश्चिम किनारपट्टीवरील वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. महापालिकेच्या सुमारे 35 शाळा या स्थलांतरित मुंबईकरांच्या तात्पुरत्या निवार्‍यासाठी सज्ज ठेवल्या होत्या. मुंबईतील गिरगाव, वरळी, बांद्रा, वेसावे, सात बंगला, गोराई, मढ या चौपाट्यांवर 93 जीवरक्षक तैनात करण्यात आले असून, ते गुरुवारपर्यंत तैनात असतील. चौपाट्यांवर  रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 8 तुकड्या, नौदलाच्या 5 तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. नियंत्रण कक्षात असलेल्या 5 हजारांपेक्षा अधिक कॅमेर्‍यांच्या माध्यमातून मुंबईतील सर्व घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी आपत्कालीन कक्षात पोलिसांसह अन्य शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरात मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साठण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे पाणी साचण्याच्या 300 पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप बसवण्यात आले होते. वादळामुळे उन्मळून पडलेली झाडे अग्निशमन व उद्यान विभागामार्फत तातडीने हटवण्यात आली. यासाठी प्रत्येक विभागामध्ये 4 याप्रमाणे 96 पथके नेमण्यात आली होती. नशिबाने चक्रीवादळाने दिशा बदलली आणि आधीच कोरोनाशी झुंजणार्‍या मुंबईला या वादळाशी लढण्याची वेळच आली नाही. 

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देऊन येथील परिस्थितीची व महापालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या कामांची पाहणी केली. अ‍ॅनी बेझंट मार्गावरील लव्ह ग्रोव्ह पंपिंग स्टेशनलगतचा परिसर, बीकेसी मेट्रोस्टेशन लगत महापालिकेद्वारे उभारण्यात येत असलेल्या फ्लड गेट कामाची पाहणी केली. तर शहरातील अन्य भागात चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरध्वनीवरून आढावा घेतला.

रत्नागिरी तालुक्यातील किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसला. तालुक्यात झाडे पडल्याने नऊपेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. महावितरणच्या तारा तुटून पडल्या, जाहिरात बोर्डसह दुकानांचे पत्रेही उडाले. पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच रत्नागिरी तालुक्याच्या किनार्‍यापट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने दाणादाण उडवून दिली. 

गणपतीपुळेलाही वादळाचा तडाखा

प्रसिद्ध श्री गणपतीपुळे मंदिर परिसरातही या वादळाचा मोठा तडाखा बसला. मंदिरासमोरील उभारण्यात आलेल्या शेडचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. येथील स्वागत कमान व आजूबाजूच्या परिसरातही झाडे मोडून पडल्याने नुकसान झाले.

खेड, गुहागरमध्ये कोट्यवधींची हानी; चारजण जखमी

निसर्ग चक्रीवादळाने उत्तर रत्नागिरीतील दापोली, मंडणगड, गुहागर व काही प्रमाणात चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्याला तडाखा दिला आहे. प्रशासनाने वादळापूर्वीच खबरदारी म्हणून गुहागर, मंडणगड व दापोलीतील पाच हजार लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले होते. जिल्ह्यात चारजण जखमी झाले आहेत.