Sat, Feb 16, 2019 08:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेलार-कोटक; भाजपमधील वाद चव्हाट्यावर

शेलार-कोटक; भाजपमधील वाद चव्हाट्यावर

Published On: Mar 15 2018 1:00PM | Last Updated: Mar 15 2018 1:25PMमुंबई  : राजेश सावंत 

 मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मुंबईतील ७०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली. पण, भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी ७५० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याची मागणी करून, थेट शेलारांनाच आव्हान दिले. त्यामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेनेच्या ५०० चौरस फुट घरांच्या माफीच्या प्रस्तावाची हवा काढून घेण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मुंबईतील ७०० चौररस फुटाच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याची मागणी केली. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलारांची मागणी मान्य करत, पालिकेला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी महापालिका सभागृहात ठरावाची सूचना सादर करून, हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यासाठी महापौर विश्र्वनाथ महाडेश्र्वर यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. 

या ठरावात कोटक यांनी शेलारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ७५० चौरस फुट घरांना मालमत्ता करात माफी देण्याची मागणी केली. ही मागणी करून थेट शेलारांना आव्हान दिल्यामुळे भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेलार व कोटक यांच्यात कटूता निर्माण झाली होती असे बोलले जात आहे. शेलारांसोबत दिसणारे कोटक अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दिसू लागल्यामुळे शेलार नाराज होते, असे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.

भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या मागणीनुसार आपण ७५० चौरस फुट घरांना मालमत्ता करात माफी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आपण ठरावाच्या सूचनेतही ७५० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याची मागणी केली. त्यामुळे शेलार व आपल्यात मतभेदाचा प्रश्र्नच येत नाही. असे मत मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केले.