होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीत इमारतीला आग, एकाच कुटुंबातले ४ ठार(व्हिडिओ)

अंधेरीत इमारतीला आग, एकाच कुटुंबातले ४ ठार

Published On: Jan 04 2018 7:44AM | Last Updated: Jan 04 2018 11:17AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील लोअर परळमधील दुर्घटना ताजी असतानाच आणखी एका इमारतीला आग लागून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले आहेत. मरोळ भागातील मेमून मंझिल या चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला मध्यरात्री आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत अडकलेल्या १७ जणांना बाहेर काढण्यात आलं. 

दाऊद अली कपासी (वय, ८०), तस्लीम अपासी कपासी (वय, ४२), सकीना अपासी कपासी (वय, १४) आणि मोहीन अपासी कपासी (वय, १०) अशी आगीत ठार झालेल्‍यांची नावे आहेत.

बुधवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्र अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही. 

अग्‍निशमन दलाने दिलेल्‍या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्‍याला आग लागली, यावेळी त्‍यामध्ये ४ जण होते. आग लागताच संपूर्ण मजला आगीत सापडला. त्‍यामुळे लोकांना बाहेर येता आले नाही. यातच त्‍यांचा होरपळून मृत्‍यू झाला. तर, इमारतीच्या चौथ्‍या मलल्‍यावरील ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. इब्राहिम कोठारी, सकीना कोठारी, हुसेन कोठारी, हजीफा कोठारी आणि झारा कटलरीवाला अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर लोली स्‍पिरीट रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.