Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकरी लाँग मार्चला सेना-मनसेचा पाठिंबा

शेतकरी लाँग मार्चला सेना-मनसेचा पाठिंबा

Published On: Mar 11 2018 1:45AM | Last Updated: Mar 11 2018 1:44AMभिवंडी/मुंबई : प्रतिनिधी

शेतमालाला योग्य भाव, संपूर्ण कर्जमाफी, शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण सवलती आदी विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला किसान सभेचा लाँगमार्च मुंबईच्या वेशीवर धडकला आणि शिवसेनेने शहापूरातच मोर्चाला सामोरे जात आपला पाठिंबा जाहीर केला. पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शेतकर्‍यांच्या न्याय हक्कांसाठी निघालेल्या या मोर्चाला जाहीर पाठींबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोर्चाला पाठिंबा देत सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालक मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री दादा भुसे या दोन मंत्र्यांना मोर्चेकर्‍यांच्या भेटीसाठी पाठविले. भिवंडीजवळील वळकस गावी हा लाँग मार्च मुक्‍कामी असतानाच शिंदे व भुसे तिथे पोहोचले. लाँग मार्चच्या नेत्यांशी आणि शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला.

शिंदे यांनी या भेटीतच उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील संवाद साधला. शिवसेना कायम शेतकर्‍यांसोबत असून मागण्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, या मोर्चाचा मुक्‍काम शनिवारी ठाण्यात असून मोर्चेकर्‍यांसाठी सोयीसुविधाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज ठाकरे यांनीदेखील किसान सभेचे सचिव अजित नवले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मोर्चाला पाठींबा जाहीर केला आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर मनसे किसान सभेसोबत असून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत मोर्चात सहभागी होतील असे त्यांनी सांगितल्याचे नवले म्हणाले. 

ठाणे आणि मुंबईत मोर्चातील शेतकर्‍यांचे जंगी स्वागत करून त्यांना आवश्यक ती मदत करावी, असे आवाहनही मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या या लाँग मार्चला अनेकांचा पाठींबा मिळत असून आपचे नेते ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनीही  पाठींबा दर्शवत मोर्चात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.