Tue, Apr 23, 2019 18:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीच्या ‘पॅड’ वुमेन; इकोफ्रेंडली सॅनेटरी नॅपकिन्सची निर्मिती

धारावीच्या ‘पॅड’ वुमेन; इकोफ्रेंडली सॅनेटरी नॅपकिन्सची निर्मिती

Published On: Feb 11 2018 8:25AM | Last Updated: Feb 11 2018 8:25AMधारावी : अरविंद कटके

अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाची सध्या देशभर चर्चा सुरू असताना इकोफ्रेंडली सॅनेटरी नॅपकिन निर्मितीसाठी धारावीत कार्यरत असलेल्या ‘शेड’संस्थेच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगार मिळत आहे. या प्रकल्पाची भुरळ पडल्याने विश्‍वसुंदरी मानुषी छिल्‍लर हिने सुद्धा नुकतीच धारावीला भेट दिली होती. 

गरीब, दुर्लक्षित आणि संवेदनशील घटक, विशेषत: अबालवृद्ध, महिला आणि मुलींना मदतीचा हात  देण्यासाठी शेड म्हणजेच सोसायटी फॉर ह्युमन अ‍ॅण्ड  एन्व्हायर्मेंटल डेव्हलपमेंट संस्थेची स्थापना करण्यात आली. समाजातील दुर्बल घटक हा संस्थेने केंद्रबिदू मानला असून त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी पाहणी-गरज-प्रयोग-कार्यवाही अशा क्रमाने संस्था कार्यरत आहे. शिक्षण, जागरूकता, उत्पन्न निर्मितीसाठी कौशल्याचा प्रशिक्षण, मूल्य/नागरिकत्व, सांप्रदायिक सौहार्द, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य, पोषण, पर्यावरण असे विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात.

सॅनेटरी नॅपकिनचे ‘आनंदी’ नावाचे हे प्रोडक्ट बनवताना केमिकलचा वापर करण्यात आला नसून ते पूर्णतः इकोफ्रेंडली असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात येत आहे. इतर नॅपकिनपेक्षा स्वस्त आणि सुंदर असल्याने मुंबई व गुजरातमध्ये त्यांना चांगला खप आहे.  धारावीतील गरीब, होतकरू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून स्वयंरोजगाराकरिता प्रेरित करण्यासाठी शेड संस्था 35 वर्षांपासून धारावीत कार्यरत आहे. संस्थेकडे 73 महिला बचत गट काम करतात. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतल्या महिलांनी एकत्र येऊन चालवलेली संस्था अशी ‘शेड’ संस्थेची ओळख निर्माण झाली.

मारियम रशीद या डेप्युटी सीईओ तर सीईओ म्हणून राजेंद्र तावडे अनेक वर्षांपासून संस्थेची धुरा सांभाळीत आहेत. एड्स, टीबी, माहिती अधिकार, महिला कायदे,  घरबसल्या रोजगाराचे प्रशिक्षण असे विविध उपक्रम महिलांसाठी शेडने आजवर यशस्वीरित्या राबवले. चार वर्षांपूर्वी युनाइटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी)च्या वतीने सॅनेटरी नॅपकिनचा हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला.  युनिट उभारण्यासाठी आकार इनोव्हेशनची मदत घेण्यात आली.  महिलांना याबाबतचे प्रशिक्षण देऊन मशिनरी, कच्चामाल  यूएनडीपीने पुरवला. त्यानंतर हा प्रकल्प शेडच्या हाती सोपवण्यात आला.