Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनुदानपात्र शाळा यादीत मुंबई विभाग अपात्र

अनुदानपात्र शाळा यादीत मुंबई विभाग अपात्र

Published On: Mar 01 2018 2:04AM | Last Updated: Mar 01 2018 1:56AMउमरोळी : रामकृष्ण जमादार

सन 2011 साली  कायम विनाअनुदानावर  मान्यता  मिळालेल्या पण,  फेब्रुवारी, 2014 मध्ये कायम शब्द वगळलेल्या आणि मूल्यांकन  झालेल्या  राज्यातील 146 शाळांची  अनुदान पात्र यादी बुधवारी सायंकाळी जाहीर झाली. त्यात  मुंबई  विभागातील मुंबई , पालघर व ठाणे  जिल्ह्यातील एकाही  शाळेचा समावेश  नाही. मुंबई विभागातील शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी शासनाने प्रश्न- चिन्ह उभे केल्याने या शाळा प्रशासनाने संताप व्यक्‍त केला आहे. या निर्णयाबाबत शासनाने पुन्हा विचार करावा, अन्यथा 12 वी च्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा या शाळांनी दिला आहे.

कायम  शब्द  वगळलेल्या  राज्यातील शाळांचे शासन स्तरावरून प्रथम ऑनलाइन  मूल्यांकन  करण्यात  आले. त्यानंतर 2014 मध्ये प्रत्येक  जिल्ह्यातील पात्र शाळांचे राज्यस्तरीय  वरिष्ठ व सक्षम अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष  पाहणी  करण्यात आली. त्यात  मुंबई  विभागातील  मुंबई, पालघर  व ठाणे  जिल्ह्यांतील काही शाळांचा समावेश  होता. मागील 4 वर्षे शासनाने  अनुदान पात्र यादीच जाहीर केली नाही.  दरम्यान, बुधवारी  सायंकाळी शासनाने जाहीर केलेल्या अनुदान पात्र शाळेच्या यादीत बहुतेक जिल्ह्यांना न्याय देण्यात आला, मात्र या यादीत मुंबई ह्या राजधानीच्या विभागाचा विसर पडल्याचा चित्र समोर आले. 

मुंबई  विभागातील अशा  बहुतेक शाळा ह्या आदिवासी  भागातील आहेत. शासनाच्या वरिष्ठ अधिकारींनी या शाळांना भेटी देऊन प्रत्यक्ष मूल्यांकन केले आहे. उच्च  गुणवत्ता  संपादन करणार्‍या ह्या शाळा आहेत. मग, या शाळांची नावे यादीतून गायब झालीच कशी? असा प्रश्न शाळा प्रशासनाला पडला आहे. मुंबई  शिक्षण  विभाग  ह्या शाळांकडून वारंवार  प्रस्ताव ही मागवत होती. तेव्हा  या शाळांनी त्याची वेळोवेळी पूर्तता ही केली होती. तरीही यादीतून नाव गायब होण्यामागचे गूढ या शाळांना समजलेले नाही.