Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे डबेवाले कुरियर क्षेत्रात...

मुंबईचे डबेवाले कुरियर क्षेत्रात...

Published On: Feb 23 2018 10:09AM | Last Updated: Feb 23 2018 10:09AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ते दररोज दोन लाख डबे वेळेत पोहचतात...ऊन, वारा, पाऊस कोणीही त्यांची वाट अडवू शकत नाही. शिक्षण फारसे नसताना भल्या भल्या मॅनेजमेंट गुरूंना ज्यांच्या कौशल्याची भुरळ पडली आणि प्रिन्स चार्ल्सपासून अनेकांनी ज्यांना सलाम केला त्या मुंबईच्या डबेवाल्यांचे काम प्रत्यक्ष कसे चालते हे पाहून व्यवस्थापन शास्त्राच्या प्राध्यापकांसह विद्यार्थी भारावून गेले. निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘डबेवाला’ या विषयावर आयोजित  मुंबई डबेवाला असोसिएशनचे सरचिटणीस सुभाष तळेकर यांच्या विशेष व्याख्यानाचे. आम्ही लवकरच कुरियरच्या क्षेत्रात उतरणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठ नाट्यगृहात गुरुवारी झालेल्या व्याख्यानाला विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके व डॉ. अभिजित शेळके उपस्थित होते.  तळेकर यांनी आपल्या खास शैलीत व्यवसाय सुरू कसा झाला, तो कसा चालतो आणि भविष्यातील वाटचाल कशी राहील हे उलगडून दाखविले.  ‘दररोज संबंधित व्यक्‍तीच्या घरून सकाळी नऊ वाजता घेतलेला डबा दुपारी बारा वाजता ऑफिसात पोहचतो. चार टप्प्यांत डबा वितरणाचे काम चालते. लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी असूनही वेळेवर डबा पोहचविला जातो. मुंबईत पाच हजार डबेवाले असून 400 जणांची एक टीम असते. एकजण 120 डबे पोहचवण्याचे काम करतो. गांधी टोपी आमची ओळख असून टोपी नसल्यास 50 रुपये दंड असतो. कुणाला अचानक सुटी लागल्यास बदली कर्मचारी असतो. 126 वर्षांच्या इतिहासात डबेवाल्यांनी कधीही संप केला नाही. ‘मुंबईसारख्या मोठ्या शहरात वेळेत डबे पोहचवण्याचे काम डबेवाले करतात. भक्‍कम व्यवस्थापन यंत्रणा असल्यामुळे डबेवाले कुरियर व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहेत. कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या बळावर कुरियर क्षेत्रातही यशस्वी होतील’ असे तळेकर म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्दीकी उबेसा यांनी केले.

प्रिन्सच्या लग्नाचे आमंत्रण
‘इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी कौतुक केल्यानंतर देशाचे लक्ष आमच्याकडे वेधले गेले. तोपर्यंत आम्ही दुर्लक्षित होतो. मुंबई भेटीत चर्चगेट स्टेशनबाहेर थांबून चार्ल्स यांनी चर्चा केली होती. चार्ल्सच्या लग्नाला आम्ही मराठमोळा आहेर पाठवला होता. त्यानंतर भारतात तिघांना लग्नाचे निमंत्रण आले होते. त्यात दोन डबेवाले होते’ असे तळेकर यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.