होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

मुंबई क्रिकेट असोसिएशनवर अखेर प्रशासक

मुंबई क्रिकेट असोसिएशनवर अखेर प्रशासक

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 2:24AMमुंबई : प्रतिनिधी

न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणार्‍या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर आता प्रशासकाच्या नियुक्ती होणार हे निश्‍चित झाले आहे. न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या नावाची शिफारस केली. त्या नावावर उद्या गुरूवारी न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक शिक्कामोर्तब करतील.

न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सप्टेंबर 2016 मध्ये अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र 18 महिने उलटून गेले तरीही मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यात पळवाट काढत असल्याचा आरोप करून ही समिती बेकायदा ठरवून  बरखास्त करा अशी विनंती करणारी याचिका एमसीएशी संलग्न असलेल्या मुस्लीम स्पोर्ट्स क्लबच्या नदिम मेमन यांनी केली आहे. 

या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाने कालच याच मुद्यावर एमसीए आणि बीसीसीआयला चांगलेच फटकारून प्रशासक नेमण्याचे संकेत देताना प्रशासक म्हणून सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची नावे सुचविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमसीए आणि बीसीसीआयने आज सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या नावाची शिफारस न्यायालयाकडे केली. याची दखल घेऊन न्यायालयाने उद्या बुधवारी त्यावर निर्णय देण्याचे निश्‍चित केले आहे.