Tue, Mar 19, 2019 05:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे दंगली घडवतील

सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे दंगली घडवतील

Published On: Apr 07 2018 2:11AM | Last Updated: Apr 07 2018 1:44AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे समाजा-समाजात जातीय विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्तेसाठी ते जातीय दंगली घडवून आणायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. मात्र, भाजप हा सिंहाचा पक्ष असून, अशा लांडग्यांना घाबरत नाही. 2019 च्या निवडणुकीत या लांडग्यांची शिकार करून पुन्हा सत्तेवर येऊ, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा समाचार घेताना मुख्यमंत्री आक्रमक झाले होते. सिंचन घोटाळ्यापासून ज्यांची भ्रष्टाचाराची अखंड मालिकाच सुरू होती, ज्यांनी आजवर केवळ राज्याला लुटले, त्याची ही डल्लामार यात्रा आहे. भाजपबद्दल दलित, आदिवासी आणि ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजप आरक्षण काढणार असल्याची आवई उठविण्यात आली आहे; पण सामाजिक आरक्षण असावे ही भाजपची स्पष्ट भूमिका आहे, असे ठणकावतानाच आर्थिक आरक्षणाचे समर्थन करणार्‍या शरद पवार यांची आरक्षणाबाबत नेमकी भूमिका काय, असा सवाल फडणवीस यांनी केला. ज्यांनी राज्याला लुटले, त्यांना साडेचार लाखाच्या उंदरांच्या गोळ्यांचा भ्रष्टाचार दिसू लागला आहे. असे आरोप करताना तुम्हाला लाज कशी वाटत वाटत नाही, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत उंदीर मारण्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावरून अत्यंत कडक शब्दांत टीकास्त्र सोडल्याने व्यासपीठावर बसलेल्या खडसेंची मात्र पुरती अडचण झाली.
पवारांनी चहावाल्याच्या नादाला लागू नये

मुख्यमंत्री कार्यालयात होणार्‍या चहापान खर्चावरून शरद पवार यांनी भाजपला लक्ष्य केले होते. पवार यांच्या या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी महामेळाव्यात खणखणीत उत्तर दिले. ते म्हणाले, शरद पवार जे पितात ते आम्ही पाजू शकत नाही. आम्ही चहाच पितो आणि आमच्याकडे येणार्‍या लोकांनाही आम्ही चहाच पाजतो. शरद पवार यांनी चहावाल्याच्या नादी लागू नये. गेल्या निवडणुकीत उडालेली धूळधाण तुम्ही लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही चोख प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री वर्गाच्या मॉनिटरसारखे वागतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे. माझा वर्ग आमदारांनी भरलेला आहे, तुमच्यासारखा रिकामा नाही.

सेनाप्रमुखांचे स्मरण...  आणि टाळ्यांचा गजर

   या महामेळाव्यात भाजपच्या शिवसेनेबाबत बदललेल्या भूमिकेची प्रचिती आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात सुरुवातीला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मरण केले. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांना मी आज अभिवादन करतो. ते पक्षाचे नसले, तरी त्यांनी हिंदुत्वासाठी अखंड जागर केला. हिंदुत्वासाठी त्यांनी सतत भाजपला साथ दिली. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर महामेळाव्यात टाळ्यांचा एकच गजर झाला. मुख्यमंत्र्यांच्या या वक्‍तव्यानंतर आगामी लोकसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यानंतर बोलताना, 2019 मध्ये राज्यात पुन्हा एनडीएचे सरकार येईल, असे वक्‍तव्य केले. मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना सोबत रहावी ही आमची हार्दिक इच्छा असल्याचे ते म्हणाल्याने युतीच्या चर्चेला बळ मिळाले. 
 

 

tags ; Mumbai,news ,Congress, hallabola ,Yatra, Chief, Minister ,Devendra, Fadnavis, Aggressive,