Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘गडकरी नौदलाला नाही तर, पाकला मदत करणार का?’

‘गडकरी नौदलाला नाही तर, पाकला मदत करणार का?’

Published On: Jan 12 2018 2:34PM | Last Updated: Jan 12 2018 2:39PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

‘नौदलाला मुंबईतून बाहेर काढून पाकिस्तानला मदत करायची आहे का?’ असा संतप्त सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमीन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम? असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल (गुरूवार ११ जानेवारी) केले होते. भारतीय नौदलाचा अवमान केल्याप्रकरणी गडकरींनी माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

‘सत्तेची नशा डोक्यात गेल्यानेच भाजप नेते अशा प्रकारची भाषा बोलत आहेत.  मुंबईच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकणाऱ्या तरंगत्या हॉटेलसाठी गडकरी एवढे आग्रही का आहेत? त्यांना तरंगत्या हॉटेलात एवढा रस का आहे? याची चौकशी झाली पाहिजे,’अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सावंत यांनी केली आहे. 

२६/११च्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेतली पाहिजे. या अगोदरही मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दक्षिण मुंबईतील हेलीपॅडसारख्या व पुनर्निमाण प्रकल्पांना भारतीय नौदलाने आक्षेप घेतला होता. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. हे समुद्रमार्गे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्पष्ट झालेले आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबईत नौदल असणे आवश्यक आहे. मात्र, गडकरी यांच्या विधानातून भाजपाचा राष्ट्रवाद हा किती भोंगळ आहे, ते दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

‘दहशतवादी प्रवेश करू शकतात अशा ठिकाणी नौदलाने राहणे अपेक्षित आहे. मग सगळेच दक्षिण मुंबईत राहण्याची धडपड का करतात? नौदलातील अनेक जण माझ्याकडे जमिनीची मागणी करण्यासाठी येतात. मी इंचभरही जागा देणार नाही. परत कुणीही माझ्याकडे येऊ नका,’ असे वक्तव्य मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या भूमिपूजनानंतर केले होते.