Sun, Apr 21, 2019 00:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कामत व देवरा गट पुन्हा सक्रिय; काँग्रेसमध्ये निरुपम हटावचा नारा!

कामत गट पुन्हा सक्रिय; निरुपम हटावचा नारा!

Published On: Mar 18 2018 11:27AM | Last Updated: Mar 18 2018 11:27AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संजय निरुपम हटावचा नारा गुंजू लागला आहे. शिवसेना-भाजपाकडे आकर्षित होणार्‍या काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमुळे मुंबईत काँग्रेसचे भवितव्य धोक्यात आल्याचा थेट निरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असल्याचे समजते.

मुंबईत 1992 मध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महापालिकेवर झेंडा फडकवला होता. त्यानंतर मात्र मुंबईत काँग्रेसला सत्ता उपभोगता आली नाही. पण 1997, 2002, 2007 व 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले. पण काँग्रेसचा दबदबा कायम होता. 2017 मध्ये मात्र संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यात आली. पण या निवडणुकीत काँग्रेसला 227 पैकी अवघ्या 30 प्रभागात विजय मिळवता आला. पालिकेत 2007 पासून दुसर्‍या क्रमांकावर असलेला काँग्रेस पक्ष तिसर्‍या स्थानावर फेकला गेला. या निवडणुकीत निरुपम यांनी आपल्या समर्थकांना दिलेल्या झुकत्या मापामुळे काँग्रेस नेते गुरुदास कामत समर्थकांनी निरुपम यांच्या विरोधात उघडपणे आवाज उठवला होता. पण निरुपम यांच्या डोक्यावर काँग्रेसश्रेष्ठींचा हात असल्यामुळे त्यांना कोणी हटवू शकले नाही. काँग्रेसकडे तरुणवर्ग फारसा उरलेला नाही. त्यात गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड या नेत्यांचे निरुपम यांच्याशी फारसे जमत नाही. त्यामुळे जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निरुपमविरोधात बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कामत व देवरा गट पुन्हा सक्रिय झाले आहेत.

काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे अध्यक्ष असतानाही निरुपम यांना पालिका आयुक्तांकडून अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. त्यांचा आपत्कालीन कक्षातील प्रवेशही आयुक्तांनी रोखला होता. निरुपम यांचा दबदबा राहिला नसल्याचे लक्षात येताच, काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा व शिवसेनेत प्रवेश करण्यास सुरुवात केली. यात माजी आमदार राजहंस सिंह यांच्यासह माजी विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर व शेकडो पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

अलीकडेच मुंबईतील काँग्रेसच्या दयनीय अवस्थेबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. एवढेच नाही तर, थेट काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे व्यथा मांडण्यात आली आहे. 2019 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्माण करायचे असेल तर, मुंबई काँग्रेसमध्ये बदल हवाच, असे साकडेच कार्यकर्त्यांनी गांधी यांना घातल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.