Sun, May 26, 2019 15:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचा महामेळावा, मुंबईकरांना मनस्ताप!

भाजपचा महामेळावा, मुंबईकरांना मनस्ताप!

Published On: Apr 07 2018 2:11AM | Last Updated: Apr 07 2018 1:58AMमुंबई : प्रतिनिधी

भाजपने मुंबईत आयोजित केलेल्या महामेळाव्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कार्यकर्त्यांना घेऊन अनेक वाहने बीकेसीत आल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल 4  ते 5 तास वाहतूक रखडली. मुंबईकरांना त्याचा जोरदार फटका बसला. वांद्रे टर्मिनसहून बीकेसीकडे जाण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना बस मिळते. पण सामान्य मुंबईकरांना बस मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या मुंबईकरांनी बीकेसीकडे जाणार्‍या भाजप कार्यकर्त्यांच्या बसेस अडवून आपला संताप व्यक्त केला.

गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठीही भाजपने सांताक्रूझ विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढली होती. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर चार ते पाच तास वाहतूक कोंडी झाली होती. बाईक रॅलीमुळे बिग बी अमिताभ बच्चन पाच तास या वाहतूक कोंडीत अडकले होते. तर शिवसेनेच्या एका नगरसेविकेचे फ्लाईटच हुकले होते. आजही भाजप कार्यकर्त्यांच्या बसमुळे आणि अन्य वाहनांमुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून भाजपचे कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्यासाठी भाजपने 28 विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती. या ट्रेन पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी आणि वांद्रे या स्थानकात थांबणार होत्या. मात्र विशेष ट्रेन असल्याने त्यांना विलंब झाला. ठाणे स्थानकात जी ट्रेन 9 वाजता येणे अपेक्षित होते, ती पाहिली ट्रेन 1 वाजता आली. त्यानंतर इतर रेल्वे आल्या. या कार्यकर्त्यांना स्टेशन ते बीकेसी मैदानापर्यंत येण्यासाठी खास बस आरक्षित करण्यात आल्या होत्या.

ठाणे स्टेशनवरून सुमारे 70 बसेस सोडण्यात आल्या होत्या. दुसरीकडे बेस्टच्या 170 बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. ज्या रात्रीपासून फेर्‍या मारत होत्या. याशिवाय मुंबईतूनही विविध भागातून वाहने मोठ्या संख्येने आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे मुंबईकर अडकून पडले. ‘कार्यकर्त्यांसाठी सोडण्यात आलेल्या बसमुळे मुंबईकरांची गैरसोय झाली. त्रास सहन करावा, त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो’, असे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले.
 

 

tags ; Mumbai,news, Big, traffic, jams,way, to, Western, Express, bjp, rally,