Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्टेअरिंग हाती, बस न्यायची कुठे कळले नाही!

स्टेअरिंग हाती, बस न्यायची कुठे कळले नाही!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : राजेश सावंत

बेस्ट समितीची मंगळवारी 2017-18 या आर्थिक वर्षातील शेवटची बैठक होती. या बैठकीत अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाजपने त्यांच्या कार्याचा गौरव करताना, कानपिचक्याच जास्त दिल्या. भाजपचे सदस्य सुनिल गणाचार्य यांनी, स्टेअरिंग हातात, पण बस कुठे न्यायची कळलेच नाही, असा शब्दांत बेस्ट अध्यक्षांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. त्यावर, भाजपाची ही तळमळ की मळमळ, असे प्रत्युत्तर दिले.

बेस्ट समितीची मंगळवारी शेवटची बैठक असल्यामुळे विद्यमान अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुनिल गणाचार्य यांनी अध्यक्षांना समुपदेशातून कानपिचक्या दिल्या. आठ वर्षांपूर्वी कोकिळांच्या वाढदिवसाला आपण गेलो होतो. त्यावेळी तुम्ही नगरसेवक होणार, असे भाकीत व्यक्त केले होते. आज ते नगरसेवकच नाही तर, बेस्ट समितीचे अध्यक्षही झाले, असे गणाचार्य म्हणाले.

बेस्ट समिती सदस्यपदी नियुक्ती दिल्यानंतर कोकीळ यांना आपण पहिल्या वर्षी अध्यक्षपद स्वीकारू नका, असा सल्ला दिला होता. समितीचे कामकाज काय असते, ते त्यांनी समजून घेतले असते तर त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ चांगला गेला असता. बेस्टच्या पडत्या काळात कर्मचार्‍यांना बोनस मिळवून दिला. पण तोच बोनस आज कर्मचार्‍यांकडून परत घेतला जात आहे. कर्मचार्‍यांना वेळेत पगार मिळावा, यासाठी अध्यक्षांनी प्रयत्न केले. पण त्यात यश आले नसल्याचेही गणाचार्य यांनी यावेळी नजरेस आणून दिले. यावर शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य कामगार नेते सुहास सामंत यांनी गणाचार्याचे नाव न घेता, अध्यक्षांबद्दल ही तळमळ आहे की मळमळ, असा टोला लगावला. तुम्ही आई जगदंबेच्या आशीर्वादाने अध्यक्ष बनला आहात. बेस्ट कामगार असल्यामुळे तुम्हीच बेस्ट अध्यक्ष म्हणून योग्य होता. गेल्या वर्षभरात तुम्ही नेहमीच बेस्टच्या हितासाठी झगडलात. त्यामुळे आता कोणी काय बोलतो, याकडे लक्ष देऊ नका, असा सल्लाही सुहास सामंत यांनी यावेळी कोकीळ यांना दिला. दुसरीकडे या एकूणच घडमोडींची चर्चा महापालिकेसह बेस्ट वर्तुळात चांगलीच रंगली होती.

Tags : Mumbai, Best Bus, Standing Committee, shiv sena, BJP


  •