Wed, Apr 24, 2019 19:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएनबीचा इतर बँकांना सावधानतेचा सल्ला

पीएनबीचा इतर बँकांना सावधानतेचा सल्ला

Published On: Feb 16 2018 2:31AM | Last Updated: Feb 16 2018 2:18AMमुंबई :  प्रतिनिधी 

तब्बल 11 हजार 400 कोटींच्या झालेल्या घोटाळ्यामुळे हादरून गेलेल्या पंजाब नॅशनल बँकेने इतर बँकांना पत्र पाठवून हा घोटाळा करण्यांच्या अनोख्या पध्दतीबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये मुंबईतील ब्रीच कँडी शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍याला हाताशी धरून हा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. कनिष्ठ स्तरावरील एक अधिकार्‍याला हाताशी धरून बोगस लेटर ऑफ अंडरटेकिंग तयार करण्यात आले व त्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला आहे.

पीएनबीने आरोप केला आहे की, नीरव मोदीच्या कंपन्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार करताना भारतीय बँकांच्या परदेशातील शाखांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अनेक नियमांकडे कानाडोळा केला व त्याचा फटका सर्वांना बसला आहे. गीतांजली जेम्स या मोदीशी संबंधित कंपनीवर देखील मेहेरनजर करण्यात आली. जेव्हा कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंगसाठी पुन्हा बँकेशी संपर्क साधला त्यावेळी हे संशयास्पद व्यवहार झाले असल्याचे समोर आले.
 

घोटाळ्यासाठी एलओयूचा वापर

काय आहे एलओयू  एलओयू म्हणजे ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग.’ हे एकप्रकारे हमीपत्र असते. हे पत्र एक बँक दुसर्‍या बँकेच्या शाखांना जारी करते. हमीपत्राच्या आधारे बँकेच्या परदेशी शाखा कर्जदारांना कर्ज किंवा क्रेडिट दिले जाते. 

असा सुरू झाला घोटाळा 

नीरव मोदीने मामा मेहूल चोक्सीच्या मदतीने डायमंड आरएस, सोलर एक्स्पोर्ट, स्टेलर डायमंडस् नावाच्या तीन हिरे कंपन्या स्थापन केल्या. या तीन कंपन्यांच्या माध्यमातून हाँगकाँगमधून माल आयात करण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली गेली. अलाहाबाद बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर हे पत्र काढण्याची मागणी करून याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचे सामान मागवण्यात आले.

अन् घोटाळा उघडकीस आला

पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला पाच आणि अ‍ॅक्सिस बँकेला तीन लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली होती. सुमारे 280 कोटी रुपयांचे सामान आणल्यानंतर 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले.  अधिकार्‍यांनी बँकेचे लेटर दाखवून पेमेंटची मागणी केली. त्यावर जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरा, असे बँक अधिकार्‍यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात बँकेने जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँकेत एक रुपयाही तारण न ठेवता या तिन्ही कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचे उघड झाले.

बनावट एलओयू 

नीरव मोदीला जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट आहेत. बँकेचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुलनाथ शेट्टी आणि त्यांचे सहकारी मनोज खरात यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करताना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांची सपशेल पायमल्ली केली होती. बँकेच्या काही खातेदारांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाल्याचे आतापर्यंतच्या तापसात उघड झाले आहे. तसेच इतर बँकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आल्याचे उघड झाल्याने बँकेतील अधिकारीही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.