Wed, Apr 24, 2019 08:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बँकिंग सुधार योजनेविरोधात मोहीम

बँकिंग सुधार योजनेविरोधात मोहीम

Published On: Jan 20 2018 2:12AM | Last Updated: Jan 20 2018 2:03AMमुंबई :  प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या बँकिंग सुधार योजनेविरोधात देशव्यापी मोहिम राबवण्यात येत असून या योजनेविरोधात बँक कर्मचारी व अधिकार्‍यांनी दंड थोपटले आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईडज असोसिएशन व ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या वतीने ही मोहिम राबवण्यात येणार असून सुधार योजनेविरोधात देशभरातून एक कोटी स्वाक्षर्‍या जमवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.  राज्यातून 15 लाख स्वाक्षर्‍या जमवण्यात येणार असून या सर्व स्वाक्षर्‍या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येतील व बँकिंग सुधार योजना बंद करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी दिली.

बँक ग्राहक, शेतकरी, व्यापारी, कारखानदार, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा या मोहिमेला मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  बँकेच्या एकत्रिकरणाला विरोध, बँकांच्या खासगीकरणाला विरोध, मोठ्या उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची थकित कर्जे माफ करण्याच्या निर्णयाला विरोध अशा प्रकारे विरोध करण्यात येईल. बड्या थकित कर्जांच्या वसुलीसाठी बँकांना जास्त अधिकार मिळावेत, बड्या थकित कर्जदारांची नावे प्रसिध्द करावीत, जाणिवपूर्वक कर्जे थकवणे हा फौजदारी गुन्हा ठरवावा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पुरेसे भांडवल उपलब्ध करुन द्यावे, बचत खात्यातील व्याजदरात वाढ करावी, छोट्या व मध्यम कर्जावरील व्याजदर कमी करावेत, बँकेच्या विविध सेवांवरील शुल्क कमी करावे अशा विविध मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तुळजापूरकर यांनी दिली.